केसपुरी (केशवपुरी)
बहुतेक काणे कुटुंबियांचे मूळ गाव ‘वरवडे वाडा केसपुरी’ हे आहे. केसपुरी ही वाडी गणपतीपुळ्यापासून ८कि.मी. उत्तरेकडे समुद्रकिनारी आहे. जयगड खंडाळा मार्गे ६ कि.मी. व कोळीसरे येथून हे अंतर १४ कि.मी. आहे. कोळीसरे येथील श्रीलक्ष्मीकेशव देवतेवरून या वाडीला ह नाव मिळाले. श्रीलक्ष्मीकेशव मूर्तीची स्थापना या गावी होणार होती. तशी व्यवस्थाही काणे कुटुंबियांनी केलेली दिसते. देवतेच्या दृष्टांताप्रमाणे लक्ष्मीकेशव कोळीसर येथेच राहिले. पण त्यांच्याच नावावरून गावाला केशवपुरी हे नाव मिळाले. पुढे केशवपुरी या शब्दाचा अपभ्रंश होऊन केसपुरी हे नाव रूढ झाले.

काणे कुटुंबियांची घरे रीळ व केसपुरी या गावामध्ये आहेत. पूर्वी रीळ व केसपुरी हे एकाच गाव असावे पण पुढे रेव्हेन्यू हद्दीनुसार रीळ गाव वेगळे होऊन केसपुरी वरवडे भागात समाविष्ट झाले. त्या काळी काण्यांच्या दोन बंधुंपैकी रीळेतील काण्यांनी खोतकीचे काम व केसपुरीतील काण्यांनी कुळकर्णीपद भूषविले. विविध कारणपरत्वे केसपुरीतून बावधन, निवेंडी, गणेशवाडी, खेड, चिपळूण, नंदुरबार, यवतमाळ, मुंबई, गुजरात अशा अनेक ठिकाणी काण्यांची घराणी वृत्तीसाठी अथवा नोकरी-उद्योगासाठी स्थलांतरीत झाली.

आज केसपुरी ही वरवडे गावाची छोटी वाडी असून त्याची लोकसंख्या ५५ एवढीच आहे आणि केसपुरीमध्ये केवळ ‘विष्णू दत्रात्रय काणे’ यांचेच घर अस्तित्वात आहेत. ज्या ठिकाणी श्री लाक्ष्मीकेशवाची प्रतिष्ठापना होणार होती, ती जागा आजही अस्तित्वात आहे व काणे कुटुंबियांच्या सामाईक ताब्यात आहे. दरवर्षी या ठिकाणी देवाची दाखण (उद्गिरी करणे ) वाडीतील लोक मोठ्या श्रद्धेने करतात. रीळ व केसपुरी येथील काणे कुटुंबियांना, वंशपरंपरेने आलेला, ग्रामदेवतेचा पहिला मान आहे दरवर्षी गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी ग्रामदेवता चंडीकेची पालखी वाडीत येते व दोन दिवस नमन (खेळ ) वगैरे कार्यक्रम होतात. हा शिमगोत्सवाचा भाव असतो. त्यामध्ये वाडीत काणे हे प्रथम मानकरी आहे.
 
आयनी मेटे
मुंबई-गोवा महामार्गावर रात्नागीरी तालुक्यातील खेड तालुक्यात सुमारे ४००० वस्तीचे आयनी मेटे हे गाव आहे. खेडपासून चिपळूणच्या दिशेने १६ कि.मी. अंतरावर डाव्या बाजूस लवेल फाटा व उजव्या बाजूस आयनी मेट्याचा फाटा आहे. या फाट्यापासून ६ कि.मी अंतरावर हरण्डोंगर व जगबुडी नदी यांच्यामध्ये सुमारे ३०० वर्षांपूर्वी शंकराजी गोविंद कान्हेरे यांनी हे गाव वसवले. गावाच्या दक्षिणेस दरीचा उतार व उत्तरेस उंच डोंगर असलेला ह हिरवागार परीसर अतिशय देखणा आहे. ब्रिटीश अधिकारी जॉक्सन याचा वध करणारे हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे याच गावाचे सुपुत्र ! कान्हेरे यांच्या व्यतिरिक्त दामले, बेडेकर, जोगळेकर यांचीही येथे घरे आहेत.

फाट्यावरून खाली उतरल्यावर प्रथम डाव्या बाजूस मेटे लागते. मेट्याला श्री गणपतीचे सुंदर मंदिर असून दरवर्षी माघी चतुर्थीस तेथे गणेशजन्माचा उत्सव असतो. पुण्याच्या डी.जी. कॉपिअर्सचे श्री दामले यांचे तेथे श्री मुरलीधर मंदिर आहे. मेट्याला आजही ८-१० ब्राह्मण कुटुंबे राहतात. झोलाई ही मेट्याची ग्रामदेवता आहे.

आयनी हे कोकण रेल्वेवरचे एक स्टेशन आहे. कोकणातल्या बऱ्याच गावांचे वैशिष्ट्य म्हणजे एकाला एक लागून असलेले गावठाण नसते. सर्व घरे वाड्यांवर एकमेकांपासून काही अंतरावर असतात. त्यामुळे आपण गावात आहोत असे भासत नही.
सध्या आयनी गावात काण्यांची दोनच घरे आहेत. एक श्री प्रकाश मधुसूदन काणे व दुसरे तळीतले श्री जगन्नाथ काणे हे रामदासी म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या घराला लागूनच असलेली एक जागा दाखविली ज्या जागेवर काही पिढ्यांपूर्वी श्री रघुनाथ काणे यांनी एक यज्ञ केला होता व तेव्हापासून पुढील पिढ्या दीक्षित काणे म्हणून ओळखल्या जाऊ लागले.
पूर्वी बहुतेक काणे मंडळींचे भिक्षुकीचा व्यवसाय होता. कान्हेरेनी गाव वसल्यावर भिक्षुकांची गरज निर्माण झाली व त्यांनी काही काण्यांना भिक्षुकीसाठी गावात आणले असे सांगतात . या वरून सुमारे २५०-३०० वर्षानपासून काणे कुटुंबीय आयनी मध्ये रहात असे म्हणता येईल. काणे यांनी बांधलेले एक श्री गणपती मंदिर आयनीमध्ये आहे. आयनी गावाचे ग्रामदैवत केदारनाथ आहे सुमारे १० वर्षांपूर्वी एक निवृत्त अधिकारी पांडुरंग बालाजी जानवरकर , यांनी सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून मंदिराचा जीर्णोधार केला आहे. भोईवाड्यात विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. आजही गावात हायस्कूल आहे. गावात बारा बलुते आहेत.

येथे शंकराजी कान्हेरे यांनी बांधलेला चौकोनी आकाराचा एक सुंदर व प्रक्षणीय वाडा आहे. कै.श्री. ना. पेंडसे येथे वरचेवर येत असत व याच ठिकाणी त्यांना तुंबड्याचा खोत या कांदंबरीची कल्पना सुचली. तळीतल्या श्री, जगन्नाथ काणे यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे काही कालापूर्वी आयनी मेट्यातील काही काणे मंडळी पुढील व्यवसाय करण्यासाठी काशी येथे गेली व ती सर्व जन ‘काणे वाडी’ नावाच्या वस्तीमध्ये राहतात.
 
मुरडे
मुंबई-गोवा महामार्गावर खेडच्या उत्तरेला सुमारे ५ कि. मी. अंतरावर मुरडे हे २००० वस्तीचे गाव वसलेले आहे. एकूण बारा वाड्यांचे हे गाव असून त्यापैकी ब्राह्मणवाडी, कुणबीसमाज, रामवाडी, शिंदेवाडी, डिंगणवाडी, गोठळवाडी, सुत्तरवाडी, खोतवाडी, बौद्धवाडी या प्रमुख वाड्या आहेत. शेती ह प्रमुख व्यवसाय असून भट, शेंगदाणा, चवळी ही पिके आणि आंबा व काजू मोठ्या प्रमाणावर आहेत. गावाला लागून नारिंगी नदी असून त्या मगरींची वास्तव्य आहे. ही नदी पुढे दाभोळ खाडीला मिळते. जवळच असलेल्या नातूवाडी धरण्याचे पाणी गावात येते व अनेक ठिकाणी बंध फुटल्याने शेतातून वाहत. पण आजूबाजूला जंगल असल्याने आणि रानडूकारांचे त्रास असल्याने रब्बी किंवा उन्हाळी हंगामात या पाण्याचा फारसा उपयोग केला जात नाही.

 ‘रामवरदायिनी’ ही ग्रामदेवता असून नवरात्रामध्ये मोठा उत्सव होतो. ‘खेमराज’ हे ग्रामदैवत असून हे स्थान गावापासून दीड कि. मी. वर डोंगराच्या पायथ्याशी आहे. हे महादेवाचे स्थान असून विशेष म्हणजे या मंदिराचे बांधकाम केलेले नाही.

भारतरत्न महामहोपाध्याय कै.पांडुरंग वामन काणे यांचे मुरडे हे मूळ गाव! त्या ठिकाणी अज्धी कै. पां. वाकणे यांचे वाडीलोपार्जीत घर आहे. गावात सद्य तीन काणे कुटुंब राहतात.त्यापैकी शी. विलास चिंतामणी काणे यांचा ज्योतिषाचा व्यवसाय आहे. दुसरे श्री शाम भार्गवराम काणे यांचा पोल्ट्रीचा व्यवसाय असून ते पोस्टही चालवतात. ही कुटुंबे आठ पिढ्यांपासून येथे रहाता आहेत. याशिवाय लिमये, नाफडे व मंडपे यांची प्रत्येकी एक, एक व तीन अशी घरे आहेत.

मुरडेमध्ये १२ वी पर्यंत ज्युनियर कॉलेज आहे. गावात विठ्ठलरखुमाईचे मंदिर असून कार्तिकी एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमा या काळात मोठा उत्सव साजरा केला जातो.

१९६३ साली पां. वा. काणे यांना भारतरत्न पुरस्कर मिळाल्यावर ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार मुरडे गावी करावयाचा होता. पण त्यांच्या वयोमानाप्रमाणे तेथे शक्य नसल्याने, ग्रामस्थांनी मुंबई येथे जाउन दादरला छबिलदास हायस्कूलमध्ये पां. वा. काणे व त्यांच्या पत्नी असा दोघांचा सत्कार केला होता. या कार्यक्रमासाठी मुरडे गावाशी संबंधित अशा सुमारे २५० व्यक्ती उपस्थित होत्या.
 
रीळ
रीळ हे रत्नागिरी तालुक्यात पश्चिम किनाऱ्यावर डोंगराच्या कुशीत सामान्यपणे ३ते ४ कि.मी. परिसरात वसलेले एक छोटे खेडे आहे. रीळ पुणे-रत्नागिरी, मुंबई-रत्नागिरी रस्त्यावर निवळी फ्त्यावरून जयगड रस्त्यावर सुमारे ३५ कि.मी. आणि कोल्हापुरहून रत्नागिरीस येतान हाथखंब्यापासून जयगड रस्त्यावर सुमारे ४५ कि.मी. वर गणपतीपुळ्यापासून ८ कि.मी. अंतरावर आहे.

श्रीवीरभराडीन ही ग्रामदेवता असून त्याच्याशेजारी श्री विश्वेश्वराचे व श्री गाजनांचे देवालय आहे. गजाननाच्या मंदिरात भाद्रपद महिन्यात रीळ व केसपुरीच्या काणे कुटुंबियांची उपासनेची प्राचीन पूर्वापार परंपरा आहे, म्हणून तेथील काणे पार्थिव मूर्ती आणीत नाहीत . आज रीळ गावामध्ये ३ काणे, ६ साठे, १ विद्य व १ दिवेकर अशी १२ राहती कुटुंबे आहेत. श्री विश्वेश्वराचे व श्री गाजनांन मंदिराचे यजमान पद काणे यांचेकडे आहे. ब्रिटीशकालीन सनदेचे वार्षिक रुपये ३०/- श्री दिगंबर कमलाकर काणे यांच्या नावे आजही येतात. काणे यांचेकडे रीळचे खोतकीचे काम असून आज ८६ वर्षांचे श्री कमलाकर भिकाजी कुलकर्णी हे वडिलोपार्जित खोती चालवीत आहेत. रीळमध्ये महाजानपद असलेल्या गद्रे कुटुंबियांचे श्री लक्ष्मीनारायण मंदिर आहे व त्याच्याशेजारी ओंकारेश्वराचे मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे हेमाडपंथी आहेत.
 
केळशी
निसर्गसौन्दर्याने नटलेले, बहुतांशी स्वयंपूर्ण असलेले पण आज २१ व्या शतकातही जगापासून काहीसे अलिप्त असलेले हे छोटेसे गाव आपल्या खास वैशिष्ट्यांसह आपल्याच मस्तीत असते. केळशी गावाचे ऐतिहासिक महत्व म्हणजे त्याने अनेक नवरत्न या देशाला दिलेली आहेत. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ गाव केळशी आहे. तर माराठेशाहीमधील सरदार फडके, केळकर, लागू हेही केळशीचेच! शिवाजी महाराजांनी ज्यांना गुरु मानले ते बाबा याकुब सरवरी पण केळशीचेच! आणि लोकमान्य टिळकांचे अजोळीही केळशीचेच!

या गावाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन वेळा, छत्रपती संभाजी महाराजांनी एक वेळा तर थोरल्या बाजीरावांनी एकदा भेट दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. इतिहास काळातच नव्हे तर वर्तमानतही केळशीची संबंध असलेल्या अनेक महनीय व्यक्ती आहेत. आदरणीय कै. पांडुरंगशास्त्री आठवल्यांचे आजोळ केळशी तर माजी केंद्रीय राज्यमंत्री सुमित्राताई महाजन यांचे नाव देखील केळशी आहे.

या गावाची नागराचना अतिशय सुंदर व रेखीव आहे. गाव कसे असावे, सांडपाण्याचा निचर कसा करावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे केळशी होय. सरळ, सुंदर मातीचे रस्ते, मोठमोठ्या माडा-पोफळीच्या बागा रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे, मागेपुढे अंगण अशी गावाची रचना ! पाण्याच्या भरपूर उपलब्धतेमुळे दुपीकी जमीन, ३ कि.मी. लांबीचा स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारा ह्याबरोबरच श्री महालक्ष्मीचे मंदिर, याकुबबाबांचा दर्गा ज्यावर वसला आहे ती टेकडी, भारजा नदी व समुद्र यांचा संगम अशी या गावाची अनेक खास वैशिष्ट्ये आहेत.

भातशेती ह मुख्य व्यवसाय आणि त्याबरोबरच उन्हाळ्यात खाच्रान्मधून कडवे वाल, कुळीथ, उडीद, हरभरे ही पिके तर नारळ, सुपारी, केली याबरोबरच विड्याची पाने, मिरी, जायफळ मसाल्याचे पदार्थ ही उत्पादन काढली जातात. कोकण किनाऱ्यामुळे मच्छीमारी आहेच. या सर्वांमुळे आर्थिकदृष्ट्याही गावात सुबत्ता आहे. परिणामत: गाव शैक्षणिकदृष्ट्या खूपच सुधारलेले असून ह्या गावात १९२० सालापासून हायस्कूल आहे. कनिष्ठ महाविद्यालयांबरोबरच ३ बँका, कस्टम कार्यालय, स्वतंत्र पोस्ट व टेलेफोन एक्सचेंज, लाकूड कापण्याच्या गिरण्या, मच्छिमारांचे यांत्रिक ट्रोलार्स या आधुनिक सोयींनी युक्त आहे. केळशी गावाबाहेर असलेले श्री महालक्ष्मीचे मंदिर विजापुर्कालीन बांधकामाच्या धाटणीची आठवण करून देते. या देवीची यात्रा पण प्रसिध्द आहे.

आर्थिक उन्नती बरोबरच उत्सवात सर्व जातीजमातींना उत्सवात स्थान देऊन, सर्व समाजाला एकत्र गुंफण्याचे काम कसे असावे याचा एक सुंदर वस्तुपाठ देणारे हे टुमदार गाव म्हणूनच कोकणातील सर्वसामान्य गावांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आणि निराळे आहे.
 
मुर्डी आंजर्ले
मुर्डीचा उल्लेख मरुत्तरी असा संस्कृतमध्ये करण्यात आला आहे. हे गाव सुमारे १००० वर्षांपूर्वी वसलेले असावे. मुंबई-गोवा मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील, खेडपासून दापोलीमार्गे एस.टी. ने आंजर्ल्याला जाता येथे. पूर्वी मुंबईहून बोटीने हर्णे बंदरात उतरून जाता येत असे.

 हे गाव, हर्णेमुरुड गाव वसण्यापूर्वी वसले असावे आहे एतिहासिक कागदपात्रांच्या आधारे दिसते. पूर्वी केळास, केळशी, मुरुड इत्यादी पंचक्रोशीतील गावांतून देवाच्या उत्सवाचे निमंत्रण म्हणून मुर्डी गावाला निमंत्रण पत्रिका पाठविण्याची प्रथा होती.

आज मुर्डी जेमतेम २५ घरे असलेले एक छोटे, खोती गाव आहे. विमलेश्वर हे ग्रामदेवत असून त्याचे मंदिर कोणी बांधले याबाबत माहिती उपलब्ध नाही. तथापि कोणा एक गुजर माणसाने सुमारे ४०० वर्षांपूर्वी विमलेश्वर मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे. या देवत्स्थांनच्या उत्सवासाठी अंताजी गोविंद पेंडसे व गोविंद हरी खाडिलकर यांनी १८१६ मध्ये पेशव्यांना केलेल्या विनंतीवरून पेशव्यांनी देवस्थानाला पावणेसहा बिघे जमीन दिली. परंतु १८१६ मध्ये पेश्वाई संपुष्टात आल्याने या मदतीचा उपयोग होऊ शकला नाही. मात्र या व्यवहाराच्या आधीपासून सुरु असलेले रु. १४ चे वार्षिक अनुदान आजतागायत दिले जात आहे.

मुर्डी येथे विम्लेश्वराच्या नजिक पेंडसे यांनी बांधलेले श्री गणपती मंदिर आहे . १८१८ सालच्या चैत्र महिन्यात मंदिर अग्रींच्या भक्षस्थानी पडले, तेव्हा पेंडसे यांनी त्याची डागडुजी केली. त्यानंतर १८३९ साली नव्याने मंदिर बांधून, नवीन संगमरवरी मूर्तीची स्थापना केली. मुर्डी येथे काणे यांचे एकच घर आहे. मुर्डी हे गाव लोकसंख्येने लहान असले तरी तेथील काही कुटुंबांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली आहे. परांजपे हे एक असेच घराणे. परांजपे यांच्याकडे महर्षी धोंडो केशव कर्वे येत असत. त्यांनी रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या लहान मुलाची हुशारी जाणून त्याला पुण्याला आणून त्याची शिक्षणाची व्यवस्था केली. हा मुलगा म्हणजेच रँग्लर परीक्षेत पहिले आलेले जागतिक कीर्तीचे गणित तज्ञ व पुणे विद्यापीठाचे कुलगुरू ‘रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे’! त्यानंतर याच घराण्यातील चंद्रकांत गजानन परांजपे यांनाही रँग्लर ही पदवी प्राप्त झाली. प्राचीन विध्येत नावलौकिक मिळविलेले अनेक शास्त्री, पंडित, विद्वान या गावात होऊन गेले आहेत. पेंडसे हे येथील असेच एक प्रसिद्ध घराणे. रथचक्र कादंबरीला ‘राष्ट्रपती पुरस्कार’ मिळालेले आणि गारंबीचा बापू, तुंबाडचा खोत इत्यादी विपुल साहित्याची निर्मिती असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक व कादंबरीकार ‘श्री. ना. पेंडसेही’ याच गावचे !

आंजर्ले आणि मुर्डी ही गावे तशी जुळी भावंडे आहेत.या दोन्हीमध्ये फक्त एक पाणी नसलेली छोटी खाडी आहे. आंजर्ले येथे काणे हवालदार यांचे एक घर आहे. आंजर्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे कड्यावरील सुमारे ८०० वर्षांपूर्वीचे श्री गणपती मंदिर आणि विस्तीर्ण, स्वच्छ आणि मन हरवून टाकणारा सुंदर समुद्रकिनारा!

अजून पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत नसल्याने ह किनारा प्रदूषणमुक्त असून त्याचे सौंदर्य अबाधित आहे.
 
देवघर
निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणामध्ये सह्याद्रीच्या कुशीत, खेड तालुक्यात जगबुडी नदीच्या काठावर देवघर गाव वसले आहे. गावाच्या नावाप्रमाणे गावात अनेक प्राचीन देवालये आहेत. ह्यामध्ये खेम रवणनाथ व सोमेश्वर ही प्रमुख देवळे आहेत. उपलब्ध माहितीनुसार खेम रवळनाथाच्या सोबत ज्या काही प्राचीन मूर्ती आहेत त्या काळबाई, जगदंबा, दुर्गा देवी, महालक्ष्मी, रामवर्धन, मानाई, वाघजाई, झोलाई, गणपती, सिमातापशी व बसवा अशा प्रमुख मूर्ती आहेत.

 गावापासून ३ कि.मी. अंतरावर खेम रवळनाथाच्या शेजारी काळकाई आईचे लहानसे मंदिर आहे. ह्या मंदिरात सुद्धा काळकाई, मोकाशी व धलचाचेदा अशा तीन मूर्ती आहेत. देवळाच्या चारी बाजूंनी सपाट मोकळे मैदान असलेले काळ्या दगडातील बांधकाम असलेले हे ग्रामदैवतेचे मंदिर ५०० वर्षांपूर्वींचे जुने आहे. कोकणातील ऊनपावसाच्या माऱ्यामुळे मोडकळीस आलेल्या ह्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम ग्रामस्थांनी ३० मे २०१० रोजी पूर्ण केले.

याशिवाय गावामध्ये विठ्ठल-रुखमाई, हनुमान, जन्नई व भोमेश्वर यांची मंदिर आहेत. हिंदू संस्कृतीप्रमाणे सर्व सण व उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. प्रतिवर्षी माघ शुक्ल पंचमीपासून सात दिवस अखंड हरीनाम सप्ताह गेली ७१ वर्षे साजरा केला जातो. ह्या सप्ताहामुळे गावाला प्रतीपंढरपूर संबोधिले जाते.

देवघरमध्ये अनेक नामवंत ग्रंथपंडित तसेच संत-महंत होऊन गेले. कै. रामचंद्र उर्फ रामभाऊ सीताराम काणे हे गावातील पहिले किराणा मालाचे व्यापारी.पलीकडच्या गावी जाण्यास जगबुडी नदीमुळे मोठी समस्या असे. कै. हाणे यांनी वयाच्या सत्तरीपर्यंत जगबुडी नदीच्या पलीकडे जाण्यासाठी होडी चालवून जनतेची सेवा केली.
 

CONTACT DETAILS

Kane Pratishthan
Mr. Suhas Anant Kane, Flat No.A 26, B1 Building, Aranyeshwar park, Sahakar Nagar No.1, Pune 411 009.
Copy Rights ©Kane Parivar