|
उकडीचे मोदक |
साहित्य
१ मोठा नारळ, २ वाट्या गूळ किंवा साखर (दीड वाटी गूळ व अर्धी वाटी साखर), अर्धा टी स्पून जायफळ पूड, २ टी स्पून भाजलेली खसखस, २ वाट्या तांदुळाची पिठी, ३ वाट्यांपेक्षा थोडे कमी पाणी, १ टी लोणी, अर्धा टी स्पून मीठ.
कृती
नारळचा चव, साखर, गूळ एकत्र करून शिजायला ठेवावे. मिश्रणाचा ओलावा जाईपर्यंत शिजवावे, मधून मधून ढवळत रहावे. पातेल्याचा तळ दिसायला लागल्यावर गस बंद करून जायफळ पूड, भाजलेली खसखस मिसळावी व सारण झाकून ठेवावे.
उकड -
पाणी गरम करायला ठेवावे. आधण आल्यावर मीठ व लोणी घालावे. उकडी आल्यावर पिठी घालावी. व्यवस्थित ढवळून मंद गॅसवर ठेवून दोन वाफा आणाव्यात. गरम असतानाच तुपाचा हात लावून उकड मळून झाकून ठेवावी. मोठ्या सुपारीएवढा गोळा घेऊन हातावर किंवा प्लास्टिकवर पातळ पारी करावी. २ चमचे सारण भरून पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून तोंड बंद करावे, वर टोक आणून जास्तीची उकड काढून टाकावी. मोदक पात्रात किंवा एका मोठ्या पातेल्यात आधण ठेवावे वर चाळणीत ठेवावी. मोदक पात्रातील किंवा पातेल्यातील चाळणीत स्वच्छ ओले फडके घालावे. एक-एक मोदक गार पाण्यात बुडवून चाळणीत ठेवावा. झाकण ठेवून १५ मिनिटे उकडावे. खायला देताना बरोबर तूप द्यावे.
|
खांडवी |
साहित्य -
२ वाट्या तंदुळाचे रवा, २ वाट्या चिरलेला गुळ, नारळ, तूप, १ चमचा आल्याचा रस, वेलदोडे पूड, चिमुटभर मीठ.
कृती-
धुवून वाळवलेल्या तांदूळाचा रवा तांबूस होईपर्यंत भाजावा. दुसऱ्या मोठ्या भांड्यात ४ वाट्या गरम पाणी करावे. त्यात २ वाट्या गूळ थोडं मीठ घालावे. उकडी आल्यावर त्यात भाजलेल्या तांदुळाचा रवा थोडा थोडा घालून डावाने ढवळावे. मंद आचेवर ठेवून पाणी आटत आल्यावर वेलदोडा पूड घालून खाली तवा ठेवून व वर झाकण ठेवून शिजवावे. ते मिश्रण तूप लावलेल्या थाळीत थापून वर खोबरे घालावे. गार झाल्यावर वड्या कापाव्यात. साजूक तुपाबरोबर द्यावे.
|
सांदण |
साहित्य
तांदुळाचा रवा, बारक्या फणसाचा रस, गूळ, तूप, मीठ, एक वाटी नारळाचा चव.
कृती
अ) तुपावर तांदुळाचा रवा खरपूस भाजावे. बारक्या फणसाचा गोल भोकाच्या चाळणीतून रस (पल्प) काढून रव्यात मिसळावा. गूळ घालावा, किंचित मीठ घालावे. पसरट भांड्यात हे मिश्रण घालून कुकरमध्ये शिटी न लावता १५ मिनिटे वाफवावे. नंतर वड्या कापून किंवा नारळाचे दुधाबरोबर ध्यावे.
ब) बारक्या फणसाचा गोल भोकाच्या चाळणीतून रस काढावा. ह्या रसात गूळ व मीठ घालून, एक चमचा पातळ करून लोणी व नारळाचा चव घालावा. ह्या रसात तांदुळाचा रवा घालून इडलीच्या पीठाइतपत घट्ट भिजवावे. मिश्रण पूर्ण गोड लागले पाहिजे. इडली पत्राला थोडा तुपाचा हात लावून इडलीप्रमाणे २० मिनिटे उकडावे. थंड झाल्यावर दुधाबरोबर द्यावे.
|
फणसाचे घारगे |
साहित्य
तांदुळाचे पीठ, बारक्या फणसाचा रस एक वाटी, बारीक चिरलेला अर्धी वाटी गूळ, तूप चिमुटभर मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती
फणसाच्या रसात गूळ, मीठ व दोन चमचे तेल गूळ घालून विरघळेपर्यंत गरम करावे. (जास्त आटवू नये). गार झाल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून पुऱ्यासारखे भिजवावे. प्लास्टिकच्या कागदावर पुरी एवढे घारगे थापून टेलत तळावे. साजूक तुपाबरोबर द्यावे.