कुलधर्म आणि कुलाचार हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. आपल्या गोत्रांनी दिलेल्या संस्काराप्रमाणे आपल्या कुलदेवतेची विविध प्रकारे आराधना व प्रार्थना करून आपल्या कुटुंबाच्या सुखस्वास्थ्याकरिता, पुत्रपौत्रादिकांच्या भल्याकरिता आराधना करण्याची परंपरा म्हणजे कुलधर्म व यासाठी करावयाचे आचार (कृती) म्हणजे कुलाचार.
“येन यस्य पित्तरो यात, येन याता: पितामह: |
तेन यायात, सातामार्ग, तेन गच्छन न रीष्यते ||”
मनुस्मृती, चतुर्थोध्याय:, श्लोक १७८
(अर्थ – ज्या मार्गाने आमचे पूर्वज गेले, जो मार्ग आमच्या वाडवडिलांनी अवलंबला, त्याचा सुयोग्य मार्गाने आम्ही गेलो, तर आह्माला कोणत्याही संकटापासून त्रास होणार नाही.)
कालानुरूप ह्या आचारात (करण्याच्या पद्धती) बदल होत गेल्याने तसेच काही वेळा सासुरवाशिणीने तिच्या माहेरच्या काही प्रथा किंवा कुलाचार नवीन घरात सूर केल्याने मुळच्या कुलाचारात काही बदल होत गेले. याउलट काही कुलाचार काही विशिष्ट घटना घडल्यामुळे बंद झाल्याची पण उदाहरणे आहेत. त्यामुळे मूळचे कुलधर्म तेच असूनही वेगवेगळ्या कुटुंबात कुलाचारात विविधता दिसते.
सर्वसाधारणपणे खालील मुख्य कुलाचार, काही अपवाद वगळता काणे कुटुंबामध्ये आहेत.