कै. शंकर दिनकर तथा भैय्याजी काणे |
पुर्वांचलांतील विद्यार्थींचे ओजा (गुरु)
पुर्वांचलांतील विद्यार्थींचे ओजा (गुरु) म्हणून ओळखले जाणारे, शंकर दिनकर तथा भैय्याजी काणे यांचा जन्म ६ डिसेंबर, १९२४ रोजी नाशिक येथे झाला. त्यांच्या आई-वडिलांचे नाव राधाबाई व दिनकर बलवंत काणे असे होते. हे काणे घराणे मूळचे वरवडे येथील होते. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरी निमित्ताने नाशिक, पुणे,सातारा तेथे त्यांचे वास्तव्य होते. पाच भाऊ व एक बहीण या भावंडांत भैय्याजी चवथे होते.
बालपणापासूनच भैय्याजींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले होते. १९४० साली भैय्याजी मॅट्रिक झाले व १९४२ साली पुण्याच्या एस्. पी. कॉलेजमधून इंटर आर्ट्स झाले. भैय्याजी सावरकर भक्त असल्याने राष्ट्रभक्तीचे बाळकडू लहानपणापासूनच त्यांच्या रोमारोमात भिनले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आदेशानुसार ते १९४२ साली एअर फोर्समध्ये दाखल झाले व २ वर्षे ग्राउंड इंजिनियरींग शाखेमध्ये नोकरी केली. दुसरे महायुद्ध संपल्यावर नोकरी सोडून १९४६ मध्ये भैय्याजींनी एस्. पी. कॉलेजमधून संस्कृत विषयासह बी. ए. ची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. त्याकाळी पदवी धारकांना चांगली नोकरी सहज मिळत असते. पण भैय्याजींच्या स्वभावातच अशी नोकरी करणे पसंत नव्हते.
पुढे कायद्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी बेळगावला एल्. एल्.बी. साठी प्रवेश घेतला. १९४८ साली संघावर बंदी आली. त्या काळात त्यांनी तुरुंगवास पत्करल्यामुळे त्यांना कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. तुरुंगातून सुटल्यावर बेळगावला शिक्षकाची नोकरी पत्करली. भटक्या व विमुक्त वस्तीवरील मुलांना चांगले संस्कार देण्याचे पहिले शैक्षणिक कार्य करून आपल्या सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला. तरुण वयात नोकरी लागल्यावर लग्न. संसार व कुटुंब या रूळलेल्या वाटेने त्यांना जायचे नव्हते, त्यमुळे त्यांनी पुन्हा १९५१ साली संघ प्रचारकाची अवघड वाट धरली. बंदीनंतर संघाचे काम करण्याच्या अतिशय खडतर कार्यास त्यांनी नेटाने वाहून घेतले व ६ वर्षे मेंगलोर जिल्ह्यात प्रचारक म्हणून काम केले.
भैय्याजींचा खरा पिंड शिक्षकाचा होता त्यामुळे ते काही काळच प्रचारकाचे काम करू शकले. दरम्यान त्यांनी चिपळूण, शिरोड, नाशिक, सिन्नर येथे शिक्षक म्हणून काम केले. एक-दोन वर्षांनी नोकरीत बदल करतांना त्या त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना जवळ करावयाचे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन मदत करावयाची हा त्यांचा स्वभावधर्म होता. भटकंती ह स्थायीभाव असल्याने स्थिरता कधी मानवलीच नाही. प्रत्येक ठिकाणचा सांस्कृतिक वारसा समजून घेतल्यावर शांतपणे विहित कार्यासाठी दुसरे ठिकाण निवडायचे व निर्मोही वृत्तीने तेथील स्नेह्बंध सोडून सहजपणे नवीन ठिकाणी जायचे हा त्यांचा परिपाठ झाला होता. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थीप्रियता ह त्यांचा ठेवा आश्चर्यकारक होता. त्यांचा विजार व नेहरू शर्ट ह गणवेश शेवटपर्यंत तसाच राहिला. त्यांच्या मुलखावेगळ्या भटकंतीमुळे त्यांनी जवळजवळ सगळा महाराष्ट्र पालथा घातला होता. १९६७ ते १९६९ पर्यंत वसई परिसरात म्हणून काम करून १९७० साली ते कोकणातील कोंढवे गावी गेले.
मुंबई येथील बौद्धिक वर्गात प. पू. श्री गुरुजींनी वनवासी क्षेत्रांत काम करण्याची दर्शविलेली आवश्यकता, २०-२२ वर्षांचा ठिकठिकाणचा स्वत:चा अनुभव व चिंतन यांतून त्यांना पूर्वांचलातील कामाची नवी दिशा मिळाली आणि १९७१ च्या जून महिन्यात त्यांचा मानसपुत्र जयवंत कोंडविलकर याला बरोबर घेऊन पूर्वांचलातील मणिपूर राज्यातील खारासोम गावी गेले. पूर्वांचल म्हणजे भारताच्या ईशान्येकडील आसाम, मेघालय, अरुणाचल, नागालँड, मणिपूर, मिजोराम व त्रिपुरा ही सात राज्ये ! इंफाळच्या हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी नोकरी स्वीकारून भैय्याजींनी जीवनाचा नवा अध्याय सुरु केला. १९७३ मध्ये उखरुल जिल्ह्यातील ब्रह्मदेश सीमेवरील न्यू तुसूम या गावी गेले. न्यू व ओल्ड तुसूम हे आतंकवादी कारवायांचे केंद्रस्थान होते. तेथल्या अनेक तरुणांना व कुटुंबांना आपल्या सृजनशील वागण्याने भैयाजीनी आपलेसे केले. भैय्याजी त्यांची भाषा शिकले व तिथल्या समाजात पूर्ण मिसळून गेले. भारत देश ओतप्रोत भरविला गेला असल्याने तिकडची परिस्थिती अतिशय कठीण होती. तीन वर्षांतच तिथे राहून काम करणे किती अवघड आहे हे त्यांच्या लक्षात आले. निदान नव्या पिढीची मुले वेगळ्या मातीत रुजायला हवीत हा विचार मनात पक्का झाला. या वेगळ्या विचारातून त्यांनी तिकडच्या मुलांना महाराष्ट्रात आणून शिक्षण द्यायचे ठरवले.
परंतु १९७३ च्या सप्टेंबरमध्ये आईच्या दु:खद निधनानंतर भैय्याजींना महाराष्ट्रात परतावे लागले. पुढे काही काळ सांगलीच्या सिटी हायस्कूलमध्ये नोकरी केली. पण पूर्वांचलाचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देईन आणि १९७४ साली त्यांनी पूर्वांचलातून १५ मुले शिक्षणासाठी सांगलीस आणली व त्यापुढील १० वर्षे थोड्या थोड्या काळासाठी मणिपूर, नागालँड या मुलुखांत नोकरी करून तेथील खरी माहिती गोळा केली. तो भाग भारतापासून वेगळा करण्याचे षड्यंत्र त्यांना समजून आले. त्यातूनच राष्ट्रीय प्रकल्प उभा करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. तेथील विद्यार्थ्यांना भारताच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी त्यांना इकडे आणून राष्ट्रीय एकात्मतेचे धडे देण्याची त्यांना कल्पना अपूर्व व आगळीवेगळी होती. सांगली,पुणे, वसई, नाशिक, म्हैसूर, धारवाड वगैरे शहरांत पूर्वांचलातील विद्यार्थी आणून, स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ‘पुर्वसीमा विकास प्रतिष्ठान’ प्रकल्प उभारला. पूर्वांचलातील ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी या विविध शहरांत आणून त्यांना शिक्षणाबरोबरच राष्ट्रीय एकात्मतेचे वस्तुपाठ देण्यास सुरुवात केली. राष्ट्रपुरुषांच्या गोष्टी ऐकविल्या, अमृतसरपासून कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकापर्यंत हे विद्यार्थी देश पहात फिरले आणि त्यांना भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडले. सतत २० वर्षे असा उपक्रम राबवून १९९३ साली शांतपणे वानप्रस्थाश्रम स्वीकारून काही काल चिंतनात घालविण्याचे ठरविले. त्यानंतर १९९३ ते १९९९ काळात ठाणे जिल्ह्यातील जव्हार, पाडा या परिसरांत राहून लहान मुलांना मूल्यशिक्षण शिकवून त्यांनी वानप्रस्थाश्री जीवन व्यतित केले. पुढे कॅन्सरसारख्या असाध्य आजाराने त्यांना घेरले. २६ ऑक्टोबर, १९९९ रोजी कोल्हापूर येथे वयाच्या ७५ व्या वर्षी आपल्या बंधुंच्या निवासस्थानी भैय्याजींनी आपली देहयात्रा संपविली.
आपल्या गुरुजींच्या निधनानंतर त्यांचे स्मारक उभारण्याची आणि ते सुद्धा पुर्वाचलासारख्या अनोख्या प्रदेशात ही कल्पनाच अशक्य कोटीतील वाटणारी ! पण पूर्वेच्या एका टोकावरील शाळेसाठी पूर्वेच्या बरोबरीने पुढाकार घेतला आहे तो पश्चिमेच्या लोकांनी. जणू पूर्व पश्चिमेच्या मैत्रीचा सेतू ! मणिपूरच्या विध्यार्थ्यांनी गुरुची आठवण म्हणून शाळेचा प्रस्ताव मांडला. ह्या शाळेची निर्मिती करण्यासाठी जागाही ‘पूर्वसीमा विकास प्रतिष्ठान’ या संस्थेला दान केली आणि अथक परिश्रमाने शाळेची उभारणी करून या शाळेचा ‘ओजा शंकर विध्यालयाचा’ लोकार्पणाचा कार्यक्रम भैय्याजींच्या १०व्या पुण्यतिथीच्या दिवशी २६-२७ ऑक्टोबर, २००९ रोजी खारासोम या गावी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ठीकठिकाणाहून भैय्याजींचे मैतेयी, नागा, कुकी, तांखूल, कोन्याक, रोम्मई आदि जमातीचे विद्यार्थी गुरूला आदरांजली वाहायला आले होते.
या विद्यार्थ्यांची ‘भैय्याजी आमचे दुसरे वडील होते’ (he was our second father) ही प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. त्यांचे मणिपुरी विद्यार्थी सांगतात, “भैय्याजींचे ना घरदार होते, ना संसार होता, ना पैसा होता, ना जमीनजुमला ! बँकेत साधे स्वतःचे खातेही नव्हते. घरदार, संसार होता तो राष्ट्राचा होता. संपत्ती होती ती जोडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांची, त्यांच्या परिवारांची आणि परिश्रमाने, निरपेक्ष प्रेमाने, विश्वासाने व माणुसकीने जोडलेल्या माणसांची” !
२००९ साली गणेशवाडी, जि. कोल्हापूर येथे झालेल्या काणे संमेलनात भैय्याजींनी पूर्वांचलात केलेल्या अनोख्या व असामान्य सामाजिक कार्यासाठी, काणे कुलप्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा, कै. माधव रामचंद्र काणे पुरस्कार मरणोत्तर देऊन त्यांचा गौरव केला होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व भारतीय मजदूर संघाचे संस्थापक आणि थोर चिंतक कै. दत्तोपंत ठेंगडींच्या शब्दात सांगायचे तर “ही माणसे म्हणजे देवदूत असतात, काही कारणाने त्यांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. येथे पूर्वनियोजित पुण्यकर्म करुन पुन्हा ते आपल्या मूळच्या स्थानी परत जातात.” केवळ मधला काळ आपण त्यांच्या सहवासात असतो इतकेच !