कै. डॉ. दत्तात्रय गोपाळ तथा तात्यासाहेब काणे

संपूर्ण नंदूरबार गावाला एक प्रेमळ, दानशूर व कनवाळू व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेल्या डॉ. द. गो. तथा तात्यासाहेब काणे ह्यांचा जन्म २३ सेप्टेंबर, १८९९ रोजी वेल्लूर येथे झाला. आईवडिलांचे लवकर निधन झाल्यामुळे त्यांच्या काकांनी त्यांचा सांभाळ करून त्यांना मेडिकलचे शिक्षण दिले. डॉक्टर झाल्यावर त्यांनी काही काळ एडन येथे बोटीवर नोकरी केली.
पण त्यानंतर १९२४ सालापासून नंदूरबार येथे खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. नंदुरबार तालुक्यात ७० ते ७५ टक्के वस्ती भिल्ल समाजाची ! नंदूरबार गावातही नीट रस्ते नव्हते, परिसरातील खेड्यावर जायला रस्ते तर नव्हतेच पण वाहनाची सोयही नव्हती. प्रवासाचे साधन म्हणजे बैलगाडी अगर पायी जाणे ! अशा वातावरणात डॉक्टरांचा प्रेमळ स्वभाव व रुग्णांशी असलेले निकोप संबंध यामुळे त्यांच्या यशाचा आलेख उत्तरोतर उंचावतच गेला. गावात एक्स-रे अगर लॉबोरेटरीची सोय नाही; अशा स्थितीतही त्यांनी रुग्णसेवा केली. खेड्यांमध्ये झोपडीत जाऊन बाळंतपणे केली, अशा प्रसंगी त्यांच्या पत्नी सौ. मनोरमाबाई उर्फ ताई काणे त्यांच्या मदतीला असत. रात्री-बेरात्री रुग्णाचे घरी औषधोपचारासाठी जाताना समोरच रुग्ण गरीब का श्रीमंत असा भेदभाव ते कधीच करीत नसत व धनलोभाने कोणाची अडवणूकही ते करीत नसत.
शिक्षणाकरता कराव्या लागणाऱ्या कष्टाची जाणीव असल्यामुळे त्यांनी शिक्षण संस्थांना स्वत: निरपेक्षपणे देणग्या दिल्या. आज त्यांच्या नावाने नंदूरबार एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. काणे विद्यामंदिर व  डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल ह्या दोन शाळा चालविल्या जातात.
२२ ऑक्टोबर, १९६७ रोजी त्यांचा त्यावेळचे पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू मा. ह. वि. पाटसकर व  मा. मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते सार्वजनिक सत्कार करण्यात आला. त्यावेळी मा. मधुकरराव चौधरी यांनी डॉ. काणे यांना समारंभात स्टेजवर केलेला मानाचा मुजरा आजही नंदूरबारकरांच्या स्मरणात आहे. नंदूरबारमध्ये त्यांनी पुणे विद्यापीठाची बहि:शाल व्याख्यानमालाही स्व-खर्चाने सुरु करून तेथील लोकांना मोठमोठ्या वक्त्यांची भाषणे ऐकण्याची संधी प्राप्त करून दिली.
अशा ह्या धनवंतीचे धनत्रयोदशी दिवशी दि. ३१ ऑक्टोबर १९६७ रोजी निधन झाले. त्यांच्या स्नुषा रजनी काणे ह्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहतांना म्हटले आहे ते खरेच आहे.
“काणे कुळी ह्या शतकापूर्वी बालक दत्तात्रय जन्मले
दीन-दुबळ्यांची सेवा करुनी, ते सर्वांचे तात्या झाले
संपत्तीचे दान करोनी, विद्येला त्या भूषविले
गरिबांचे कैवारी म्हणून नंदनगरी परिचित झाले.”
 

CONTACT DETAILS

Kane Pratishthan
Mr. Suhas Anant Kane, Flat No.A 26, B1 Building, Aranyeshwar park, Sahakar Nagar No.1, Pune 411 009.
Copy Rights ©Kane Parivar