कै. नारायण विष्णू तथा मामा काणे (मामा काणे यांचे स्वच्छ उपहारगृह ह्या संस्थेचे संस्थापक)

जन्म : २८ फेब्रुवारी, १८८५
मृत्यू : ७ जुलै, १९४२
शतकोत्तर वाटचाल चालू असलेल्या, दादरच्या ‘मामा काणे यांचे स्वच्छ उपहारगृह’ ह्या संस्थेचे संस्थापक कै. नारायण विष्णू काणे यांचा जन्म २८ डिसेंबर, १८८५ रोजी त्यांचे मूळ गाव रीळ – केसपुरी येथे झाला. स्वतंत्र उद्योग करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते लहानपणीच पेणला येऊन राहिले. पेणमध्ये त्यांनी घरगुती स्वरुपात श्रीगणपतीच्या मूर्ती बनविण्याचा व्यवसाय केला. मुंबईसारख्या शहरात स्वतंत्र व्यवसायाचे स्वप्न व्यापकरीत्या साकार होईल, ह्या हेतूने मामा पेण सोडून लवकरच मुंबईला आले. माघ शुध्द प्रतिपदा, दि. १० फेब्रुवारी, १९१० रोजी त्यांनी दादर येथे उपहारगृहाच्या व्यवसायाचा शुभारंभ केला. आर्थिक सोयीसाठी सुरुवातीस हा व्यवसाय भागीदारीत होता. चहा, नाश्ता पुरविणाऱ्या ह्या छोटेखानी उपहारगृहाचे सुरुवातीचे नाव होते ‘दक्षिणी ब्राम्हण यांचे, स्वच्छ उपहारगृह’, प्रारंभिक काळात मामांच्या बरोबरीने त्यांच्या पत्नी, आई व बहीण हे सगळे उपहारगृहाच्या कामाची व्यवस्था जातीने पाहत असत. गृहिणीवर्गाच्या सहभागामुळे घरातल्या स्वयंपाकगृहाची स्वच्छता ही उपहारगृहाच्या कामात आपोआपच आली. त्यामुळे ‘स्वच्छता व टापटीप’ ही वैशिष्ट्ये उपहारगृहाची अविभाज्य अंगे बनून राहिली.
साधारण याच काळात नारायणरावांचे भाचेही त्यांच्या मदतीसाठी उपहारगृहात येत असत. ते नारायणरावांना मामा या सर्वनामानेच हाक मारीत असत. तत्कालीन नियमित ग्राहक वर्गाकडूनही हेच नाव वापरले जाऊ लागले आणि नंतर ते सर्वतोमुखी होऊन ‘दक्षिणी ब्राम्हणांचे .....’ ऐवजी ‘मामा काणे यांचे स्वच्छ उपहारगृह’ हेच नाव रूढ झाले.
उपहारगृहाची सुरुवात ही सध्याच्या जागेपासून जवळच असलेल्या विजयनगर येथे झाली. १९२८ साली उपहारगृहाचे स्थलांतर सध्याच्या जागेवर झाले. १९३० पर्यंत उपहारगृहाच्या व्यवसायाने चांगलाच जम बसवला व मामानी थोडी उसंत घेऊन दादरमध्ये राहण्यासाठी स्वतःचे घर बांधले. ह्यानंतर हळूहळू भागीदाराला मोकळे करून व्यवसायही पूर्णपणे स्वतःच्या मालकीचा केला.
१९३० च्या दशकाच्या मध्यापासून मामांनी व्यवसायाची सूत्रे आपल्या सुपुत्राच्या (शंकररावांच्या) हाती सोपवली व आपण मार्गदर्शकाची भूमिका घेतली. स्वतंत्र व्यवसायाचा ध्यास प्रत्यक्षात आणण्यासाठी घेतलेल्या अपार कष्टांमुळे मामांचे शरीर थकत चालले होते. अखेर १९४२ मध्ये मामांनी इहलोकीची यात्रा संपवली. शंकररावांची व्यवसायातील चुणूक पाहून आपल्या व्यवसायाची धुरा अगदी सुयोग्य हाती सोपवल्याचे समाधान मामांना अखेरच्या वर्षांत नक्कीच लाभले.
 

CONTACT DETAILS

Kane Pratishthan
Mr. Suhas Anant Kane, Flat No.A 26, B1 Building, Aranyeshwar park, Sahakar Nagar No.1, Pune 411 009.
Copy Rights ©Kane Parivar