कै. श्रीपाद प्रभाकर काणे तथा काणे काका

परमचैतन्य श्री काणे महाराज

काणे काकांचा जन्म पौष वद्य पंचमी, शके १८१८, शनिवार, दि. २३ जानेवारी, १८९७ रोजी हेरे संस्थानात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रभाकर होते. काणे ह्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळ्याजवळील निवेंडी. तेथून काणे ह्यांचे पूर्वज केसपुरी येथे आले. पेशवेकाळांत श्री. काणेकाका यांचे पूर्वज धामापूरला होते व त्यांना महाजन हा अधिकार होता.
काणेकाकांना उपजतच उपासनेची आवड होती. वडिलांच्या निधनानंतर ज्येष्ठ बंधू गंगाधरपंत व मातोंश्रींसह ते बेळगावला आले. गंगाधरपंत मोठे दत्त उपासक होते. त्यांना दृष्टांतात दत्तमहाराजांनी ‘भाऊ दाजी’ असे सांगितले. दुसरे दिवशी बरोबर बारा वाजता छाटी,दंड धारण केलेले एक संन्यासी आला. गंगाधरपंत,  संन्यासी व पलीकडे काणेकाका जेवावयास बसले. जेवणानंतर संन्यासी घराबाहेर पडला. काणेकाका कुतूहलापोटी त्यांचे मागोमाग गेले तर संन्यासी बोळाच्या तोंडाशी गेल्यावर एकदम अदृश्य झाला. १९०८ साली वयाच्या १०व्या वर्षी प.पू. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाचा योग बेळगावात आला. महाराजांनी त्यांना आपलेपणाने जवळ बसवून घेतले व म्हणाले, “तुम्हाला अजून वेळ आहे. नामस्मरण असेच चालू ठेवा, योग्य वेळी आम्ही दुसऱ्याकरवी अनुग्रह देऊच”.
काकांचे शालेय शिक्षण मराठी सातवीपर्यंत झाले होते. शालेय शिक्षणाबरोबरच वे.शा.सं. रामभटजी अष्टेकर यांच्याकडे धार्मिक विधी व भिक्षुकीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले व घरचा चरितार्थ चालविला. दरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या. पण करारी स्वभाव व स्पष्टवक्तेपणामुळे ते नोकरीत फार काळ टिकू शकले नाहीत. त्या काळात नेहमी येणाऱ्या प्लेगच्या साथीने काकांना पण घेरले, त्यांना काखेत प्लेगच्या गाठी आल्या, परंतु उपासनेच्या बळावर त्यांतून ते बरे झाले. १९१८ साली गाडगीळ-थोरात यांच्या मुलीशी त्यांच्या विवाह होऊन गृहस्थाश्रमास सुरुवात झाली. १९२० मध्ये काकांना कन्यारत्न झाले. पत्नी सौ. कमलाबाई यांनी आयुष्यभर काकांना उत्तम साथ देऊन त्यांच्या परमार्थाच्या कार्यात सहकार्य केले. भक्तांवरील प्रेमाने सार्वजण त्यांना आई म्हणत.
स्वांतत्र्य संग्रामात काका सक्रीय होते. ‘पुष्पधारी’ या टोपण नावाने वीरश्रीयुक्त पोवाडे करून ते जाहीर सभांतून म्हणत असत. १९२४ साली बेळगावच्या कॉंग्रेस अधिवेशनात काकांनी स्वयंसेवक म्हणूनही काम केले. प.पू. गोंदवलेकर महाराजांनी त्यांना या क्रांतिकारकाच्या अवस्थेतून बाहेर काढून परमार्थ मार्गात आणले.
प.पू. योगानंद मलवडीकर या त्यांच्या गुरुबंधूकडून त्यांनी योगविध्येचे पूर्ण ज्ञान ‘पिंडी ते ब्रह्मांडी' आत्मसात केले. सततच्या अनुष्ठानाने अध्यात्ममार्गात प्रगती चालू असताना, महाराजांनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे अनुग्रह देण्याची योग्य वेळ आल्याने १९२५ साली प.पू. गोंदवलेकर महाराजांनी प.पू. दामोदरबुवा कुरोळीकर यांचेकरवी माघ शुद्ध सप्तमी, शके १८४७ रोजी ‘त्रयोदशाक्षरी’ मंत्र दिला. साक्षात गोमातेची सेवा करण्याची सद्गुरूंची आज्ञा काणे पतीपत्नींनी सतत ३८ वर्षे पाळली व अनेकांना त्याचे शिक्षण दिले व अनेकांना त्याचे शिक्षण दिले. घरातील गोरगरिबांना दूध-ताक ह्याचे मोफत वाटप केले. त्याचबरोबर भक्तांना उपासना व अध्यात्माचे ज्ञान देण्याचे कार्यही सतत चालू होते. सन १९४४ च्या मार्गशीर्ष शु. दशमीला प.पू. गोंदवलेकर महाराजांनी श्री. काकांना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचे सगुण दर्शन घडविले व हा दिवस पारमार्थिक जन्मदिन म्हणून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते दशमी असा दहा दिवस साजरा करण्यास सांगितले. या दहा दिवसांच्या उत्सवांत चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, रामायण, महाभारत, तसेच गुरुचरित्र, दासबोध वगैरे ग्रंथांची पारायणे करविले.
श्री.काकांनी १९३९ साली मनाच्या श्लोकांचा गूढ अर्थ सांगणारा ‘आत्मदर्शन’ हा ग्रंथ लिहिला. तो त्यांच्या तत्वज्ञानाचा पाया आहे. त्यावर मग पुढे सन १९७० साली सद्गुरूंची ‘बोला’ अशी आज्ञा आल्यावर अनेक प्रवचने केली. त्या ध्वनिमुद्रितांवरून ‘सुखसंवादमाला’ या नावाने २२ नाम महात्मची पुष्पे (पुस्तके) उपलब्ध आहेत. त्यांत त्यांचे तत्त्वज्ञान ओतप्रोत भरले आहेत. दरवर्षी वैशाखी पौर्णिमेला हिमालयातील मानस सरोवराकाठी सिद्धांची सभा पुढील वर्षातील सर्व जगातील कार्य ठरविण्याकरिता होते. त्या सभेत काका सन १९५० पासून सूक्ष्म देहाने जात असत व त्यातील भक्तांना जेवढे सांगण्यासारखे असेल ते सांगत असत. सन १९५१ च्या सभेत  योगी अरविंद व महात्मा गांधी या सभेत समील झाल्याचे त्यांचे एक पत्र आहे.
काक हयात असताना १९६९ साली त्यांचे एक शिष्य श्री. वसंतराव गोखले यांनी त्यांचे चरित्र ‘गाठीभेटी व तत्त्वज्ञान’ हे प्रसिद्ध केले. या चरित्राला पावसचे स्वामी स्वरुपानंद, श्री योगेश्वर गुळवणी महाराज, पुणे, डॉ.श्री. गोविंदबुवा उपळेकर यांनी आशीर्वाद दिले आहेत. दि. ३१ ऑक्टोबर, १९७७ रोजी अमृतसिद्धी योगावर संध्याकाळी ५ वाजता अनंतात विलीन झाले.
 

CONTACT DETAILS

Kane Pratishthan
Mr. Suhas Anant Kane, Flat No.A 26, B1 Building, Aranyeshwar park, Sahakar Nagar No.1, Pune 411 009.
Copy Rights ©Kane Parivar