कै. संगीताचार्य पंडित दत्तात्रय विष्णू काणे

एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व

पं. दत्तात्रय विष्णू काणे ह्यांचा जन्म वडील विष्णू बळवंत व आई काशीताई यांचे पोटी मार्च १९२९ मध्ये झाला. विष्णूपंतांचे डोळे लहानपणीच गेल्यामुळे त्यांना अंधत्व आले होते. तथापी ते हार्मोनियम, सतार, तबला वगैरे वाद्ये उत्तम प्रकारे वाजवीत. इचलकरंजी अधिपती श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे यांचे दरबारी ते वादक म्हणून काम करीत असत, त्यामुळे लहानपणापासूनच काणेबुवांना घरीच संगीताचे बाळकडू मिळाले. काणेबुवांना घरातील व गावातील लोक ‘बाळ’ या लाडक्या टोपण नावाने बोलावीत. बाळ वयाच्या सातव्या वर्षीच सतार, हार्मोनियम इत्यादी वाद्यांच्या बोलाचे स्वरलिपी लेखन अस्खलितपणे करीत असे. सातव्या-आठव्या वर्षी बाळ कीर्तनांना उत्तम प्रकारे पेटीची साथ करू लागला होता.
संगीतातील ही प्रगती पाहून वडिलांनी बाळला सुरुवातीला निलकंठबुवा जंगम व नंतर दत्तोपंत काळे (दोघेही पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे शिष्य) यांचेकडे संगीत शिक्षणासाठी पाठविले. बाळच्या गाण्याच्या प्रगतीतील वार्ता इचलकरंजीच्या अधिपतींपर्यंत पोहोचली. हा  मुलगा पुढे गायन शिकून, उत्तम गवई झाला तर आपल्या दरबाराला एक दरबार गवई मिळेल, म्हणून घोरपडे सरकारनी त्यांना खास शिष्यवृत्तीची सोय करून पुण्याला विनायकबुवा पटवर्धन ह्यांचेकडे गंधर्व महाविद्यालयामध्ये संगीत शिक्षणासाठी पाठविले. या काळात काणे बुवांबरोबर बापूराव पलुस्कर, राम मराठे, सहाध्यायी होते. गंधर्व महाविद्यालयाची विशारद ही परीक्षा बुवा प्रथम क्रमांकाने पास झाले. पुढे संगीतरत्न व अलंकार परीक्षाही ते प्रथम क्रमांकाने पास झाले. त्यानंतर डॉ. भडकमकर यांच्या शिष्यवृत्तीमुळे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे प्रसिध्द शिष्य पं. यशवंतबुवा मिराशी यांचेकडे बुवांचे पुढील शिक्षण झाले. १९४८ साली बुवांनी आग्रा घराण्याचे जेष्ठ गायक उस्ताद खाँ साहेब विलायत हुसेन खाँ यांच्याकडून विधीवत ‘गंडा बांधून’ सात वर्षे शिक्षण घेतले.
ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या गायकी बरोबरच जयपूर व किरणा घराण्याच्या गायकीचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यामुळे त्यांनी आपली एक परिपूर्ण शैली निर्माण करून सर्व घराण्याची वैशिष्ट्ये आपल्या गाण्यात आणली. विलंबित एक तालाबरोबर मध्यलयीतील त्रिताल, झपताल रूपक, झुमरा, तिलवाडा वैगरे तालांचा वापर त्यांच्या गायकीत जास्त असे. सुरेल आवाज, चमत्कार वाटावा अशी आग्रा घराण्याची लयकारी यामुळे त्यांचे गाणे रंगतदार होत असे. दिल्ली, आग्रा, लखनौ, पुणे, नाशिक इत्यादी ठिकाणी बुवांनी अनेक मैफिल गाजविल्या. पुण्यात शिकत असताना बालगंधर्वांची साथ करण्याची संधी अनेकवेळा बुवांना मिळाली होती, तसेच बालगंधर्व व मा. फुलंब्रीकर यांच्यावरील श्रद्धेमुळे मराठी नाट्यसंगीत व अभंगही बुवा अतिशय उत्तम सादर करीत व त्यांच्या भजनांना गंधर्व गायकीचा साजही लाभला होता.
मुंबईत असताना काणेबुवांनी फार मोठा शिष्य परिवार तयार केला. त्यामध्ये मंजुताई मोडक, शालिनी सावकार, निर्मला गोगटे, शरद जांभेकर, अशी मोठी शिष्य परंपरा तयार केली. पुढे १९५५ साली विलायत हुसेन खाँसाहेब दिल्ली येथे गेल्यावर बुवा इचलकरंजीला येऊन स्थायिक झाले. तेथे आल्यावर गजाननराव कुलकर्णी, उषा रानडे, मंगला जोशी, ऋषिकेश बोडस, शिवानंद पाटील, मंजुषा कुलकर्णी-पाटील, गिरीश कुलकर्णी असे अनेक शिष्य घडविले. इचलकरंजीला बुवांनी कोणतीही ‘फी न आकारता’ गुरुकुल पद्धतीने मोफत विद्यादान केले. कोल्हापूर-इचलकरंजी परिसरातील ग्रामीण भागांमध्ये शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा म्हणून बुवांनी एक भजनी मंडळ तयार केले व शास्त्रीय संगीतावर आधारीत भजने करावयास सुरुवात केली. हे भजनी मंडळ खूपच लोकप्रिय होते.
संगीताचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी शास्त्रीय संगीत महाराष्ट्रांत रुजविले. या महान गायकाचे स्मारक १९६७ साली “पं. बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ” म्हणून इचलकरंजीस स्थापन केले. त्यानंतर ३ दिवसांच्या संगीत महोत्सवास सुरुवात होऊन मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम इचलकरंजीकरांना ऐकविले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे केंद्र म्हणून या मंडळास मान्यता आहे. शास्त्रीय गायन, वादन, नृत्य हे विषयही मंडळात शिकविले जातात. तसेच वार्षिक संगीत स्पर्धांचे आयोजनही मंडळाकडून केले जाते.
पं. काणेबुवांच्या संगीत क्षेत्रातील या अजोड व निरलस कार्याचा गौरव म्हणून गांधर्व म्हणून महाविद्यालयाने १९६७ साली त्यांना “संगीताचार्य”  ही सर्वोच्च पदवी बहाल करून सन्मान केला. इचलकरंजी फाय फौंडेशनने त्यांना ‘निरपेक्ष गुरु आणि उत्तम गायक’ म्हणून सन्मानित केले. या सर्व पुरस्कारांपेक्षाही माझे शिष्य हिच माझी ओळख आहे असे त्यांना नेहमी वाटे.
संगीताबरोबर बुवांनी घरची शेतीही उत्तमप्रकारे केली. शेती, अवजारे या विषयांमध्ये त्यांना चांगलेच ज्ञान होते. आयुष्यभर संगीताची निरपेक्ष सेवा करणाऱ्या या साधकाचे १२ ऑक्टोबर, १९८७ रोजी इचलकरंजी येथे निधन झाले. कै. दत्तात्रय विष्णू काणे यांनी २००९ साली गणेशवाडी येथे झालेल्या काणे सामेलनांत काणे कुलप्रतिष्ठानचा भारतरत्न, महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे पुरस्कार मरणोत्तर देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.
 

CONTACT DETAILS

Kane Pratishthan
Mr. Suhas Anant Kane, Flat No.A 26, B1 Building, Aranyeshwar park, Sahakar Nagar No.1, Pune 411 009.
Copy Rights ©Kane Parivar