कै. पांडुरग वामन काणे

भारतरत्न, महामहोपाध्याय

कै. पांडुरग वामन काणे यांचा जन्म ७ मे, १८८० रोजी पेढेस किंवा परशुराम या आपल्या मामांच्या गावी झाला. काणे हे एकूण ९ भावंडांपैकी दुसरे व मुलांमध्ये सर्वांत मोठे अपत्य होते. त्यांचे वडील वामनराव हे काणे यांच्या मूळ गावी मुरडे येथे मुक्कामास होते. वामनरावांनी ऋग्वेदाचा प्रदीर्घ अभ्यास करून भिक्षुकीचा व्यवसाय स्वीकारला होता. परंतु भिक्षुकी आवडेना म्हणून ते सुप्रसिद्ध खागोलशास्रज्ञ श्री. शंकर बाळकृष्ण दिक्षित यांच्यासह पुण्यास आले. १८७३ साली मॅट्रिक व त्यानंतर १८७८ मध्ये वकिलीची परीक्षा पास करून ते दापोली जिल्हा रत्नागिरी येथे वकिली करू लागले. दरम्यान त्यांनी वेदांबरोबर उपनिषदे , गीता यांचाही अभ्यास केला. १९२५ मध्ये काणे यांचे वडील वामनराव यांचे निधन झाले.
पां. वा. काणे  यांनी वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत अमरकोषामधील  ४०० श्लोक मुखोद्गगत केले होते. १८९७ मध्ये पी. जी. मिशन स्कूल, दापोली येथून मॅट्रिकची परीक्षा ते शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १८९७ साली प्लेगची मोठी साथ आल्याने मुंबईला न जाता खूप प्रयत्नानंतर मुंबईच्या विल्सन कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. मचिहन  यांनी बहि:स्थ विध्यार्थी म्हणून त्यांना कॉलेजला प्रवेश दिला. प्लेग ओसरल्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये मुंबईला कॉलेजमध्ये दाखल होऊनही ते १८९८ मध्ये पहिल्या वर्षाची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले व त्यांना रु. १७५/- ची स्कॉलरशीप व रु.१००/- चे पारितोषिक मिळाले. आर्टस् च्या दुसऱ्या वर्षीच्या परीक्षेत संस्कृत विषय घेऊन पहिले आल्यामुळे त्यांना रु. १८०/- ची शिष्यवृत्ती मिळाली. १९०१ मध्ये बी. ए. परीक्षेत त कॉलेजमध्ये पहिले आले आणि संस्कृतमध्ये सर्वप्रथम येऊन त्यांनी “भाऊ दाजी” पारितोषिक पटकावले. त्यानंतर ते १९०२ मध्ये एल्. एल्. बी. ची पहिल्या वर्षाची परीक्षा पहिल्या वर्गात व १९०३ मध्ये ‘झाला पारितोषिक’ मिळवून एम्. ई. उत्तीर्ण झाले.
परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेणे शक्य नसल्याने त्यांनी १९०४ मध्ये रत्नागिरी येथे महिना रु. ६०/- पगारावर सरकारी शाळेत नोकरी स्वीकारली. ती करीत असताना १९०५ मध्ये सेकंडरी टीचर्स सर्टिफिकेट कोर्स परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले. त्याच वर्षी त्यांनी “Aryan manners and morals as depicted in Epics” या विषयावर निबंध लिहून बॉम्बे विद्यापीठाचे वाय. एन्. मंडलिक गोल्ड मेडल मिळवले. १९०६ मध्ये “Logic in Relation to teaching” निबंध लिहून ऑनर्स इन टिचींग मध्ये पहिला वर्ग मिळविला  तसेच “History of Alankar Literature” हा लेख लिहून ‘व्ही. एन्. गोल्ड मेडल’ मिळविले. त्याच वर्षी एका धाकट्या भावाचे निधन झाल्यामुळे काणे यांनी आपली बदली एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये करून घेतली . पुढील दोन वर्षात त्यांनी सेकंड एल्. एल्. बी. परीक्षा दिली आणि शैक्षणिक गुणवत्ता व सिनिऑरिटी डावलली जाऊन बढती न दिल्यामुळे सरकारी नोकरी सोडली. त्यांच्यावर झालेल्या या अन्यायाची उशीरा जाणीव झाल्याने शिक्षण खात्याने त्यांची संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून एल्फिस्टन महाविद्यालयात नेमणूक केली. 
यानंतरच्या काही ठळक घडामोडी पुढीलप्रमाणे –
१९०९ –  महाविद्यालयीन विध्यार्थांसाठी ‘साहित्यदर्पण’ ही दोन पुस्तके लिहिली.
१९११ –  वयाच्या ३२ व्या वर्षी मुंबई हायकोर्टात वकिलीची सनद घेतली.
१९१२ – हिंदू मोहोमेडन लॉ ह विषय घेऊन एल्. एल्. एम्. ची परीक्षा दिली.
१९११ ते १९१८ – कादंबरी ऑफ बाणा (तीन भाग), हर्ष चरित्र (दोन भाग) व उत्तररामचरित्र या पुस्तकाचे लिखाण.
१९१३ –  संस्कृत व प्राकृत शिकविण्यासाठी विल्सन कॉलेजमध्ये फाईलॉलॅजिकल लेक्चरर.
१९१५ –  रॉयल एशियाटिक सोसायटीचे आजीव सदस्य. एनशंट जीऑग्राफी ऑफ महाराष्ट्र या विषयासाठी मुंबई विद्यापीठाची दोन वर्षासाठी ‘स्पिंगर रिसर्च स्कॉलरशिप’.
१९१६ –  प्रो. एस् बी. भांडारकर यांचे जागी बी. ए. ला ‘रामानुजन भाष्य ऑन वेदांतसूत्र’ शिकविण्यासाठी नेमणूक. 
१९१७ ते १९२३ – प्रोफेसर ऑफ लॉ,गव्हर्नमेंट कॉलेज, बॉम्बे 
१९१७ ते १९२६ – मध्ये भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूटने प्रकाशित केलेल्या “व्यवहारमायुखा ऑफ नीलकंठा” याचे संपादन. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत जाहीर केल्याप्रमाणे “History of Dharmashastra” या पां. वा. काणे यांनी लिहिलेल्या पाच खंडातील ग्रंथामुळे काणे यांना जागतिक कितीं लाभली. त्याचा थोडक्यात तपशील खालीलप्रमाणे –
1) खंड-१ –  प्रकाशन १९३०. पृष्ठसंख्या ७६०. या ग्रंथात धर्मशास्त्र या विषयावर तोपर्यंत लिहिलेल्या लेखकांचा आणि त्यांच्या विचारांचा परामर्श घेण्यात आला आहे. 
2) खंड-२ – प्रकाशन १९४१. पृष्ठसंख्या १३६२. यामध्ये ३०० पाने, श्रौत विधी (Srauta rituals) या विषयावर आहेत. यावेळी त्यांचे वय ६१ वर्षांचे होते.
3) खंड-३ –  प्रकाशन १९४६. पृष्ठसंख्या १०८८. यामध्ये राजधर्म, व्यवहार आणि सदाचार (Customs and Customary Law) हे विषय हाताळण्यात आले आहेत.         
4) खंड-४ –  प्रकाशन १९५३. पृष्ठसंख्या ९२६, यामध्ये प्रामुख्याने पान, प्रायश्चित्त, कर्मविपाक, अंत्येष्टी, अशौच, शुद्धी, श्रद्धा, तीर्थयात्रा या विषयांचा समावेश आहे.
5) खंड-५ – प्रकाशन १९५८, पृष्ठसंख्या ७१८. यामध्ये व्रत, कला यांचा समावेश आहे. याच्या दुसऱ्या भागात संतीस (Santis) यांचा धर्मशास्त्राशी संबंध, भारतातून बौद्ध धर्म नाहीसा होण्यामागील कारणे, तंत्र आणि धर्मशास्त्र, संख्या, योग, तर्क आणि धर्मशास्त्र, पूर्वमिमांसा आणि धर्मशास्त्र (Cosmology) आणि पुनर्जन्म भारतीय संस्कृतीचे महत्वाचे आणि गुणविशेष, सिव्हिलायझेशन आणि भविष्यावरील वाटचाल या विषयांचा अंतर्भाव आहे. या ग्रंथ लेखनासाठी १९३० पासून सतत आठ वर्षे विविध ग्रंथाचे लिखाण आणि वाचन चालू आहे होते व प्रत्यक्ष ग्रंथाचे मुद्रण पाच वर्षे सुरु होते.
१९१८ पासून त्यांनी वकिली सुरु केली व बॉम्बे हायकोर्टाबरोबरच खानदेश, नागपूर, पुणे, सोलापूर, सातारा या जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा केसेस लढविल्या. श्री. काणे यांनी वकिली करताना गोरगरिबांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्धच्या अनेक केसेस कोणतीही फी न घेता लढवून, त्यांना न्याय मिळवून दिला.
१९१९ ते १९२८ या काळात ते बॉम्बे विध्यापिठाचे सेनेटचे सदस्य होते. पुण्याच्या भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळाचे ते शेवटपर्यंत सदस्य होते. सतत  ४० वर्षे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय या संस्थेच्या विविध पदांवर त्यांनी काम केले. मुंबईच्या ब्राह्मण सभेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष, विश्वस्त व सल्लागार म्हणून २१ वर्षे काम केले. श्री. काणे यांच्या अथक प्रयत्नामुळे डेक्क्न कॉलेज, पुणे ही संस्था त्याकाळी एका पार्शी पब्लिक स्कूलसाठी विकली न जाता टिकून राहिली. श्री. काणे १९३८ पासून  डेक्क्न कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य होते. ते सतत ४५ वर्षे बॉम्बे एशियाटिक असोसिएशनचे सदस्य होते. या काळात अनेक दीर्घ लेख त्यांनी सोसायटीच्या जर्नलमध्ये लिहिले.
१९२७ साली ब्राह्मण सभेच्या सार्वजनिक गणेशोत्सवात महार जातीच्या लोकांनी उत्सवांत मेळा सादर करण्याची व दर्शनासाठी जवळ जाण्याची परवानगी मागितली. व्यवस्थापन सभेत यावर  अनुकूल व प्रतिकूल अशी प्रत्येकी ५० टक्के मते पडली असतना श्री. काणे यांनी अध्यक्ष या नात्यांने कास्टिंग व्होट देऊन, त्यांचा दर्शनाचा मार्ग खुला केला होता. प्रत्यक्षात अस्पृशता निवारण कायदा मात्र १९५० मध्ये संसदेत मंजूर करण्यात आला. १९४२ मध्ये श्री. काणे यांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटीश सरकारने त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही पदवी दिली. त्याच वर्षी अलाहाबाद विद्यापीठाने ‘डी. लिट्.’ ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. १९४७ साली तत्कालीन मुख्यमंत्री बी. जी. खेर यांच्या आग्रहामुळे त्यांनी मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरूपद भूषविले. पण पुढे ते पद ३  वर्षांसाठी स्वीकारावे ही विनंती मात्र ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ हा ग्रंथ लिहिण्यास वेळ मिळावा म्हणून नाकारली.
१९४८ साली पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय पौर्वात्य परिषदेसाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या पथकात श्री. काणे होते. १९४९ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या अखिल भारतीय पौर्वात्य परिषदेच्या स्वागतसमितीचे श्री. काणे स्वागताध्यक्ष होते आणि १९५१ सालच्या इस्तंबूल येथील आंतरराष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनातील भारताच्या पथकाचे नेतृत्व श्री. काणे यांनी केले होते. या अधिवेशनात श्री. काणे यांनी युनेस्कोने ऐतिहासिक तत्वांची संस्कृत डिक्शनरी तयार करण्यासाठी अनुदान द्यावे असा ठराव मंजूर करुन घेतला व  युनेस्कोने या डिक्शनरीसाठी ५००० डॉलर्सचे अनुदान मंजूर केले. पुन्हा १९५४ मध्ये केंब्रीज येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पौर्वात्य परिषदेसाठीच्या भारताच्या पथकाचे नेतृत्वही श्री. काणे यांनी केले होते. लंडन युनिव्हर्सिटीच्या लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज या संस्थेने ऑनररी फेलो नियुक्त करून त्यांचा सन्मान केला. या संस्थेच्या एकूण २५ ऑनररी फेलोमध्ये श्री. काणे हे एकमेव भारतीय होते. १९५३ मध्ये व्हॉल्टेअर येथे झालेल्या इंडियन हिस्टरी काँग्रेसच्या अधिवेशनाचे श्री. काणे अध्यक्ष होते.
नोव्हेंबर १९५३ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी श्री. काणे यांची राज्यसभेचे सन्माननीय सदस्य म्हणून नियुक्ती केली. १९५९ मध्ये ही मुदत संपल्यानंतर दुसऱ्यांदा पुढील ६ वर्षांसाठी त्यांची नेमणूक करण्यात आली. या काळात हिंदू अॅडोप्शन, अॅक्ट, हिंदू मॅरेज अॅक्ट, हिंदू सक्सेशन अॅक्ट या विषयांवर काम करणाऱ्या विविध कमिट्यांवर त्यांनी सदस्य म्हणून काम केले. १९५९ साली भारत सरकारने त्यांची राष्ट्रीय प्राच्य विद्या शास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली १९५५ पासून त्यांनी नवीन कायद्याचे काम घ्यायचे बंद केले व संपूर्णतः ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ हे पुस्तक पूर्ण करण्यासाठी वेळ उपलब्ध केला.
कै. पां. वा. काणे यांच्या राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय विविध क्षेत्रांतील उत्तुंग कार्याचा सन्मान करण्यासाठी १९६३ साली भारत सरकारने त्यांना “भारतरत्न” हा  देशातील सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.
संपूर्ण काणे कुलाला भूषणावह आणि सतत स्फूर्तीदायक असणारे भारतरत्न, महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे १८ एप्रिल, १९७२ रोजी दु:खद निधन झाले.  
 

CONTACT DETAILS

Kane Pratishthan
Mr. Suhas Anant Kane, Flat No.A 26, B1 Building, Aranyeshwar park, Sahakar Nagar No.1, Pune 411 009.
Copy Rights ©Kane Parivar