श्री सुहास अनंत काणे |
श्री सुहास अनंत काणे यांचा जन्म गुरुद्वादाशीला दि. २५ ऑक्टोबर, १९४३ रोजी कुरुंदवाड, जि. कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील कुरुंदवाड संस्थानात इंजिनिअर होते. श्री काणे हे सहा भावंडात चौथे होते. मूळच्या कीर्तनकार काणे घराण्यातील ही परंपरा काणे यांचे वडील इंजिनिअर झाल्याने खंडीत झाली. त्यांचे शालेय व कॉलेजचे शिक्षण सांगली येथे झाले. १९६४ साली वालचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून मेकॅनिकल इंजिनिअरचा डिप्लोमा घेतल्यावर दोन वर्षे किर्लोस्कर ब्रदर्स किर्लोस्करवाडी येथे नोकरी केली. आपल्या मोठ्या बंधूपासून घेतलेली स्फूर्ती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संरक्षण विभागात नोकरी करण्याचे ठरविले आणि १९३७ साली डिफेन्स रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या पुणे येथील रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट इंजिनियर्स R & DE (Engrs.) मध्ये रुजू झाले.
१९६७ ते २००० या काळात त्यांनी आर्मीसाठी मोबाईल ब्रिजेस, माऊंटेनियारिंग इक्किपमेंटस्, हाय फ्रिक्केन्सी जनरेटिंग सेट्स व टूल्स यांच्या डिझाईन व निर्मितीवर काम केले. तसेच १९७६ ते १९८४ या काळात अनेक वेळा भारताच्या सरहद्दीवरील आर्मीच्या युनिट्समध्ये २ ते ३ महिने राहण्याची व त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या इक्किपमेंटस् ट्रायल्स घेण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. कारगिल युद्धानंतर १९८६ साली लेह-लडाखच्या पाकिस्तान सरहद्दीवरील सियाचिन ग्लेशियरवर १७००० फूट उंचीवर जवानांसाठी निवास उभारणी तसेच १०००० फूट उंचीवर आर्मीसाठी हॉस्पिटल उभारणीच्या धाडसी व आव्हानात्मक कामासाठी श्री. काणे यांची निवड झाली. त्या कामाच्या काळात उणे १५ ते २० अंश सेल्सियस तापमानात, प्रचंड, थंडी, थंडगार वारे,अति उंचीवरील, विरळ हवेमुळे श्वसनास होणारा त्रास अशा सर्व अडचणींवर, ‘की हे व्रत न घेतले आम्ही अंधतेने’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याला ओळींप्रमाणे, मात करीत जवळजवळ ५ ते ६ महिने तेथे निवास करून ती दोन्ही कामे यशस्वीरित्या पूर्ण केली. या कार्यासाठी आर्मीने ‘सियाचिन मेडल’ देऊन श्री. काणे यांचा गौरव केला.
१९९४ साल हे काणे ह्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले.सियाचिन ग्लेशियरवरील यशस्वी कामामुळे भारताच्या ७४ व्या अंटार्क्टिक मोहिमेसाठी संपूर्ण देशातून निवड झालेल्या २५ जणांच्या टीममध्ये एक सायंटिस्ट म्हणून त्यांची निवड झाली. डिसेंबर १९९४ मध्ये सुरु झालेल्या मोहिमेत ११ हजारपेक्षा अधिक कि. मी. चा समुद्र प्रवास करून, जगातील सर्वात थंड, वादळी, शुष्क आणि हाडे गोठविणारी थंडी, १५० ते २०० कि. मी. वेगाची बर्फाचे वादळे (ब्लीझाड्स), तीन महिन्यांची पूर्ण अंधारी रात्र, उणे ३५ ते ४० अंश सेल्सियस तापमान असलेल्या आणि अंटार्क्टिकाला घेऊन जाणारे जहाज भारताला परतल्यावर पुढील मार्चपर्यंत, कोणत्याही परिस्थितीत परतीचा मार्ग नसलेल्या एकाकी (Isolated) वातावरणात, अंटार्क्टिका खंडावर (दक्षिण ध्रुव) भारताच्या ‘मैत्री’ संशोधन केंद्रावर १४ महिने वास्तव्य करून श्री. काणे यांनी विविध इंजिनियरिंग विषयांचा अभ्यास व संशोधनाचे कार्य केले. मोहिमेच्या यशस्वी पूर्ततेनंतर पंतप्रधानांनी व डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी त्या टीमचा खास गौरव केला. श्री. काणे यांनी २००० साली पूर्णकालीन सामाजिक कार्यासाठी असिस्टंट डायरेक्टर पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली. मा. डॉ. कलामांच्या प्रेरणेने त्यांनी १९९६ पासून २०११ पर्यंत अंटार्क्टिका अभियान या विषयावर २५० पेक्षा अधिक, स्लाईड शो द्वारा वैज्ञानिक माहिती व देशभक्ती असा विषय एकत्र करून शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, जेष्ठ नागरिक संघ तसेच अनेक कंपन्यांमध्ये मॅनेजमेंट विषयातील टीम बिल्डींग यावर व्याख्याने दिली. यातून मिळालेले सर्व मानधन सामाजिक कर्तव्य म्हणून, काणे यांनी विविध सामाजिक संस्थांना देणगी म्हणून दिले.
१९७५ साली सुरु झालेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पहिल्या चार सचिवांपैकी काणे एक सचिव होते व हे कार्य त्यांनी १९८४ पर्यंत केले. याच कामातून सुरु झालेल्या पुण्याच्या ग्राहक पेठ ह्या सहकारी संस्थेचे ते संस्थापक संचालक व काही काळ अध्यक्ष होते. श्री. काणे यांचा अन्य सामाजिक कार्यातही सहभाग आहे. १९८६ पासून पद्मविभूषण स्व.नानाजी देशमुख यांचा दीनदयाल शोध संस्थान, दिल्ली या संस्थेच्या बीड जिल्ह्यातील डोमरी खेड्याजवळील डोंगराळ भागात ‘सोनदरा गुरुकुल’ या मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांच्या पहिली ते दहावीच्या मुलांच्या निवासी शैक्षणिक प्रकल्पामध्ये त्यांनी १८ वर्षे कार्य केले आहे. काही काळ ते प्रकल्प पालकही होते. या काळात अनेक वर्षे ते प्रत्येक शुक्रवारी रात्री स्वखर्चाने २५० कि.मी. एस.टी. चा प्रवास करून गुरुकुलांत जात, शनिवार-रविवार तेथे राहून, मुलांचा अभ्यास घेऊन, रविवारी पहाटे पुण्याला परत येऊन सकाळी ऑफिसला जात. १९९२ पासून दीनदयाल शोध संस्थानच्या चित्रकूट प्रकल्पाच्या कामात आजही त्यांचा सहभाग आहे. पुण्यातील स्व-रूपवर्धिनी या संस्थेच्या आर्थिक दुर्बल समाजाच्या मुलांच्या शैक्षणिक प्रकाल्पातही अनेक वर्षे ते कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीद्वारा मेघालय, मणिपूर व नागलँड येथील मुला-मुलींना महाराष्ट्रात आणून विविध शहरात त्यांच्या निवास व शिक्षणाच्या प्रकाल्पातही श्री काणे यांचा सहभाग आहे. पूर्वांचलांतील विविध प्रकल्पांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी महाराष्ट्रात निधी उभा करण्याच्या कामात ते सहकार्य करतात.
२००४ पासून काणे कुलवृतांत समितीचे व नंतर काणे प्रतिष्ठानचे कार्यवाह म्हणून ते कार्यरत आहेत.