ह.भ.प. नारायण श्रीपाद काणे – कीर्तनकार (गणेशवाडीकार) |
पाच पिढ्यांची कीर्तनकारांची परंपरा असलेल्या गणेशवाडीच्या काणे घराण्यात नारायण श्रीपाद काणे यांचा जन्म १२ जानेवारी १९३९ ला झाला. त्यांचे पूर्वज श्री भिकंभट हे केसपुरीहून कुरुंदवाड संस्थांनचे संस्थानिक राजे पटवर्धन यांच्या गणेशवाडी येथीस श्री गजानन मंदिराच्या व्यवस्थेसाठी सुमारे २५० वर्षांपूर्वी आले व त्यानंतरच्या पिढ्या तेथेच स्थायिक झाल्या. कीर्तनकार श्रीपाद कृष्णाजी काणे व आई सावित्री यांच्या ४ मुली व ३ मुलांमध्ये नारायण हे जेष्ठ होते.
लहानपणापासून कीर्तनाची आवड असल्याने त्यांनी वडील व चुलत्यांकडून कीर्तनाचे प्राथमिक धडे घेतले. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर चिकोडीचे कै. वामनशास्त्री चिंचणीकर यांचेकडे वार लावून संस्कृतचे शिक्षण घेतले. त्याचबरोबर पं. विनायकबुवा पटवर्धन यांचेकडे पुणे येथे शास्त्रीय संगीताचेही धडे नारायणबुवांनी घेतले. वयाच्या १८ व्या वर्षापासून सुरु केलेला स्वतंत्र कीर्तन करण्याचा परिपाठ गेली ५० वर्षांपेक्षा जास्त वर्षे अव्याहत चालू आहे. १९६५ पासून आकाशवाणीवरही कीर्तन होत आहेत. त्यांच्या पत्नी सौ. सुमती ह्या देखील उत्तम कीर्तनकार असून आपल्या पतीला कीर्तनात पेटीची साथ करत असत.
नारायणबुवांनी किमान दहा वेळा देशातील काही प्रांतात प्रवास कीर्तनाच्या निमित्ताने केला आहे. पूर्वरंग व आख्यान याच्या स्वतंत्र बांधण्या हे जसे त्यांचे वैशिष्ट्य आहे तसे कीर्तनात ‘करताल’ वादन हे एक बुवांचे वेगळे वैशिष्ट्य आहे, असे जुने जाणकार सांगतात. नारायणबुवांनी कीर्तनाचा आणखी एक विशेष म्हणजे, ह्या माध्यमातून प्रदूषण समस्येवर तोडगा म्हणून परमसद्गुरू श्री गजानन महाराज (अक्कलकोट) पुरस्कृत ‘अग्निहोत्राचा’ प्रसारचा संकल्प ! गेले ३६ वर्षे ते ‘अग्निहोत्र’ चे व्रत रोज सूर्योदय व सूर्यास्ताचे वेळी सातत्याने करत आहेत.
अखिल भारतीय कीर्तनकुलाच्या स्थापनेनंतर पहिली दहा वर्षे कोल्हापूर विभाग प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले आहे. कीर्तनकुलाच्या घोषगीताची रचनापण त्यांचीच आहे. गेल्या दहा वर्षात १५ पेक्षा अधिक कीर्तन शिबिरांचे आयोजनही त्यांनी केले आहे.
1) प्राप्त पुरस्कार व पदव्या – ‘देवर्षी नारद’ पुरस्कार
* अ. भा. कीर्तनसंस्था विठ्ठल मंदिर, दादर * नारद मंदिर, पुणे * तपोधाम आयनी मेटे जि. रत्नागिरी * शंकराचार्य करवीर पीठ यांचेकडून ‘कऱ्हाडकर पुरस्कार’* गिरगांव ब्राह्मणसभा ‘ब्रह्मानंद पुरस्कार’ * शंकराचार्य संकेश्वर पीठ ‘कीर्तन कलाशेखर’ * काशी महाराष्ट्र समाज ‘कीर्तनाचार्य’ * उज्जैन महाराष्ट्र समाज ‘कीर्तनचुडामणी’ * अखिल भारतीय कीर्तनकार संमेलन ‘कीर्तन भूषण’
२) ग्रंथ संपदा – सप्तशतिसोनाई, गतीगाजानन, ध्यास पाऊलांचा, स्पर्श तेजोराशींचा, मर्यादापुरुषोत्तम, न्यास पावलांचा ‘स्पर्श’ भक्तीगीत संग्रह, समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रावर आधारित ‘गीत समर्थायन’
३) ध्वनी मुद्रिका – दत्तचरित्र (चार), गीतगजानन (चार),गणेशमहात्म्य, चार कॅसेट गुरुप्रसाद.
४) सीडी – दत्तदरबार (दत्तगीते), भरली माझी झोळी (भक्तीगीत) गेल्या ३६ पेक्षा जास्त वर्षे कवठेगुलंद पासून अक्कलकोटची पदयात्रा व दिंडी सुरु आहे. दरम्यान गुरूंच्या पादुकांची प्राप्ती व त्यासाठी कवठेगुलंद येथे श्री दत्तमंदिर उभारले आहे. कीर्तनकार काणे घराण्याच्या चवथ्या पिढीचे प्रथितयश कीर्तनकार ह.भ.प. हरीबुवा काणे यांची जन्मशताब्दी निमित्य सात दिवसांचा सोहळा, गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. मनोहर पर्रीकर यांचे हस्ते उद्घाटन करून आणि गणेशवाडीमध्ये विविध कीर्तनकारांच्या १२१ किर्तनांचा संकल्प पुरा करून साजरा केला.
२०१० साली ठाणे येथे झालेल्या काणे संमेलनात त्यांनी कीर्तन व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी, काणे कुलप्रतिष्ठानच्या वतीने दिला जणारा, कै. माधव रामचंद्र काणे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.
प्रत्येक काणे संमेलनात पुरस्कारार्थींच्या वैशिष्ट्यावर कार्यक्रमातच तत्काळ काव्य सादर करणारे शीघ्रकवी नारायणबुवांची सर्वांनीच प्रशंसा केली आहे. आज वयाच्या ७२ व्या वर्षीपण तेवढ्याच उत्साहाने व उमेदीने कार्यरत असलेले नारायणबुवा काणे सध्या ‘कुलप्रतिष्ठानचे विश्वस्तही’ आहेत.