डॉ. भास्कर दत्तात्रय काणे |
डॉ. भास्कर दत्तात्रय काणे यांचा जन्म भावनगर येथे दि. १६ सप्टेंबर, १९३१ रोजी झाला. शालेय शिक्षण नंदूरबार येथे व कॉलेज शिक्षण अमळनेर येथे झाले. पुणे येथीस बी. जे.मेडिकल कॉलेजमधून एम्.बी.बी.एस्.ची पदवी प्राप्त केल्यावर मुंबईतून डी.ओ.एम्.एस्.ची पदविका उत्तीर्ण झाले. पुढे १९५९ पासून आपले वडील डॉ. द. गो. काणे ह्यांच्याबरोबर वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. नंदुरबार गावातील ते पहिले नेत्रशल्य विशारद होते. ह्याबरोबर त्यांची प्रॅक्टिसही चालूच होती.
नंदूरबार येथील स्विडीश मिशनरी लोकांनी चालविलेल्या क्षयरोगांच्या हॉस्पिटलची धुरा त्यांनी २० ते २२ वर्षे सांभाळली होती आणि तिही नाममात्र मानधन घेऊन ! तेथे येणारे बहुसंख्य रोगी हे आदिवासी भिल्ल समाजाचे अतीशय गरिबी व व्यसनाने पछाडलेले असत. ह्यामुळे वनवासी जीवनाचा व त्यांच्या समस्यांचा जवळून अभ्यास करायला मिळाला आणि रोगी व त्यांचे नातेवाईक यांच्याशी त्यांचे जवळचे नाते निर्माण झाले. एका क्षयरोग्याचा दूर महिन्याचा खर्चही ते स्वतः करीत असत. त्यांना धनलोभ नव्हताच, रुग्णसेवा करून त्यांच्या सदिच्छा व प्रेम मिळवणे हीच खरी कमाई असे ते मानीत.
वैद्यकीय व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असे. नंदूरबार रोटरी क्लबचे ते अध्यक्ष होते. त्या माध्यमातून त्यांनी लोकांकरिता विनामूल्य किंवा अल्पदरात वैद्यकीय शिबिरे घेतली. सर्जिकल कॅम्प, मोतीबिंदू, तसेच रक्तगट तपासणी शिबीर असे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले. नंदूरबार एज्युकेशन सोसायटी ह्या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष ही दोन्ही पदे त्यांनी भूषविली होती. नंदूरबार एस्. टी. आगाराचे ते वैद्यकीय अधिकारी होते. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, नंदूरबार शाखेचे व एल्.आय. सी. चे ते अनेक वर्षे वैद्यकीय सल्लगार होते.
शिक्षणाबरोबरच त्यांना वाचनाची अतिशय आवड होती. अनेक विषयांची पुस्तके, मासिके वाचून त्यांतील माहितीपूर्ण कात्रणे, टिपणे काढून त्यांच्या सुंदर वह्या त्यांनी तयार केल्या आहेत. अनेक विषयांची पुस्तकेही त्यांच्या संग्रही असत. ग्रंथालये, व्यायामशाळा ह्यांना त्यांनी सढळहाताने देणगी दिली आहे. विशेष म्हणजे त्या काळात ते पत्राद्वारे फ्रेंच भाषा आणि मौलवींकडून घरीच उर्दू भाषा शिकले. कॉलेज ऑफ चेस्ट फिजिशियन्स, न्यू दिल्ली, तसेच सेंटर फॉर अप्लाईड मेडिसीन खाटमांडू, नेपाळ या संथांची मेंबरशिपही त्यांना मिळाली होती.
अखेरची काळात त्यांचे हृदय तीस-पस्तीस टक्के काम करीत होते, तरीही त्यांनी रुग्णसेवेचे व्रत चालूच ठेवले. जवळजवळ पन्नास वर्षे सर्व थरांतील जाती-जमातींना वैद्यकीय सेवा दिलेले हे शांत व मृदू स्वभावाचे सेवाव्रती, आबासाहेब काणे, १९ मे, २०११ रोजी काळाच्या पडद्याआड गेले.