कै. शंकर नारायण तथा तात्या काणे

जन्म : ३ नोव्हेंबर, १९१२
मृत्यू : ८ डिसेंबर, १९८२
‘मामा काणे यांचे स्वच्छ उपहारगृह’ यश:शिखरावर नेणाऱ्या शंकरावांचा जन्म दि. ३ नोव्हेंबर, १९१२ रोजी झाला. लहानपणीच त्यांना त्यांचे वडील नारायण विष्णू तथा मामा काणे यांच्याकडूनच व्यवसायचे बाळकडू मिळाले. त्यामुळे साहजिकच व्यवसायीकाचा पिंड तयार झाला. तत्कालीन मॅट्रिकपर्यंतच शिक्षण झालेले असूनसुद्धा वयाच्या ऐन विशीतच त्यांनी आपल्या वडिलांकडून व्यवसायाची सूत्रे स्वीकारली. अर्थात शिक्षण फारसे झाले नसले तरी; धडाडी, व्यवसायाची उत्तम जाण, उत्कृष्ट माणसांची पारख, करारी स्वभाव व अपार कष्ट करण्याची तयारी अशा गुणसमुच्चयावर शंकररावांनी आपल्या व्यवसायाचा पसारा अफाट वाढवला. 
स्वतः कमी शिकलेले असूनसुद्धा त्यांनी आपल्या कमलाकर, रामकृष्ण व मुकुंद या मुलांना तसेच सुमन व पुष्पा या मुलींनाही उत्तम शिक्षण दिले. अर्थात केवळ स्वतःच्या मुलांचे शिक्षण उत्तम केले असे नसून अनेकानेक विद्यार्थ्यांना त्यांनी कधी आर्थिक तर कधी राहण्याची, जेवणा-खाण्याचीही सोय करून देऊन मदत केली. अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थानाही त्यांनी भरघोस देणग्या दिल्या. स्वभावात:च प्रसिद्धी पराङ्मुख असल्याने ह्याची त्यांनी कुठेही-कधीही वाच्यता होऊ दिली नाही.
सन १९३५ मध्ये व्यापारी व त्यांचा कामगारवर्ग, मुंबईतून व बाहेरगावातून येणारे लोक, दादरहून नोकरीला जाणारे लोक तसेच विध्यार्थी, रेल्वेने येणारे प्रवासी इत्यादींच्या गरजा दूरदर्शीपणाने ओळखून त्यांनी पुरीभाजी पार्सल व महाराष्ट्रीय (मराठी) भोजन सुरु केले. याच काळात उपहागृहाची वाटचाल हळूहळू यश:शिखराकडे सुरु झाली होती.सन १९६६ मध्ये वाढत्या मागणीमुळे व व्यापारामुळे पुर्वीची जागा व व्यवस्था अपुरी पडू लागल्याने शंकरारावांनी आपल्या तिन्ही मुलांना हाताशी धरून उपहारगृहाचे विस्तृतीकरण व नूतनीकरण करताना काळाची पावले ओळखून दाक्षिणात्य खाद्यपदार्थांची सुरुवात केली. अशा रीतीने १९१० साली मामा काणेंनी लावलेल्या रोपट्याचे  रुपांतर विशाल वृक्षात झाले.
सन १९५७ मध्ये परमपूज्य श्रीधरस्वामी सद्गुरु म्हणून लाभल्यानंतर त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. यानंतरचे त्यांचे जीवन म्हणजे प्रपंच, व्यवसाय व परमार्थ यांचा आदर्श सुरेख संगम झाले. परमपूज्य श्रीधरस्वामी महाराजांच्या प्रेरणेने चाफळ येथील श्रीराम मंदिराच्या नूतनीकरणात त्यांनी मोठा सहभाग घेतला. राष्ट्रगुरु श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या शिकवणुकीचा प्रचार-प्रसार करणाऱ्या श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड ह्या संस्थेशीही त्यांचा जवळचा संबंध होता. 
मितभाषी व प्रसिद्धीपासून अलिप्त राहणाऱ्या शंकररावांचा लोकसंग्रह अफाट होता. अनेक क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींशी व संस्थांशी त्यांची जवळीक होती. परंतु यापैकी कोणत्याही संस्थेत मनाचे पद स्वीकारण्याचे त्यांनी कटाक्षाने टाळले. आडल्या-नडलेल्याला शक्य ती सर्व मदत करण्यासाठी त्यांचा सदैव पुढाकार असे. परंतु, अशी मदत करताना त्याची वाच्यता न करणे व उपकाराची भावना न ठेवणे, ह्या वृत्तीमुळे मदतीचे ओझे न वाटता प्रेमाचा आधारच वाटत असे.
सन १९७८ मध्ये पक्षाघाताच्या व्याधीने ते आजारी पडले व त्यातच त्यांचे १९८२ साली निधन झाले. केवळ व्यापारी वृत्ती न ठेवता आत्मीयतेने, सचोटीने व उत्तम सेवाभावनेने केलेल्या उपहारगृहाच्या व्यवसायामुळे शंकररावांनी ‘मामा काणे’ हे नाव सर्वतोमुखी केले .
शंकररावांच्या निधनापूर्वीच त्यांची मुले, अर्थात मामा काणेंची तिसरी पिढी उपहारगृहाच्या व्यवसायात जोमाने कार्यरत झाली होती. सन २०१० मध्ये. श्री कमलाकर शंकर तथा बापूसाहेब काणे यांच्या दोन्ही मुलांच्या पुढाकराने उपहारगृहाची शताब्दी मोठ्या जोमाने साजरी करण्यात आली. उपहारगृहाच्या कष्टाच्या व चिकाटीच्या व्यवसायात ‘शताब्दी’ साजरे करणारे ‘मामा काणे यांचे स्वच्छ उपहारगृह’ हे कदाचित एकमेव उदाहरण असेल ! अशा चार पिढ्यांच्या यशस्वीतेचे रहस्य कोणते ? ह्या प्रश्नांचे एकच उत्तर आहे ते असे : 
‘नफा-तोटा गणितापेक्षा, माफक/योग्य दरात ग्राहकांना स्वच्छ व सकस अन्नपदार्थ पुरवणे आणि नेत्रदीपक मांडणीपेक्षा योग्य व उत्तम गुणवत्तेचे पदार्थ पुरवण्यामध्ये अधिक रस ! परिणामी,काणे कुटुंबीय व ग्राहक ह्यांचे पिढीजात स्नेहसंबंध, ऋणानुबंध अधिकाधिक दृढ होणे.’ 
काणे घराण्यातील कुटुंबा-कुटुंबातून आपलेपणाची, जिव्हाळ्याची भावना वाढीस लागावी, ह्या हेतूने सन १९५५-६० च्या दरम्यान दादरच्या मामा काणे उपहारगृहाचे तत्कालीन मालक (संवर्धक) श्री. शंकरराव नारायण काणे, पुण्याच्या रोहिणी मासिकाचे संपादक कै. वसंत सदाशिव काणे, ह.भ.प. मधुसूदन केशव काणे. (डोंबिवली) आणि श्री. रामकृष्ण काशिनाथ काणे (मुरुड) यांनी ‘कुलदीपक संग्रह’ तयार करण्याचे काम सुरु केले होते. तथापि, त्या वेळेच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीमुळे व दळणवळणाच्या आणि एकमेकांशी संवाद साधण्याच्या सोयींच्या कमतरतेमुळे दुदैवाने त्याला अपेक्षित यश येऊ शकले नाही.
 

CONTACT DETAILS

Kane Pratishthan
Mr. Suhas Anant Kane, Flat No.A 26, B1 Building, Aranyeshwar park, Sahakar Nagar No.1, Pune 411 009.
Copy Rights ©Kane Parivar