डॉ. मधुसूदन दत्तात्रय काणे |
नंदूरबारच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात उज्ज्वल यश मिळविलेल्या डॉ. मधुसूदन दत्तात्रय काणे यांचा जन्म दि. २० मे १९२९ रोजी भावनगर येथे झाला. त्यांचे शालेय व इंटरसायन्स पर्यंतचे शिक्षण नंदुरबार येथे झाले. त्यानंतर त्यांनी डी.ए.एस्.एफ्. ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली व रेडिओलॉजिस्ट पण झाले. आपले वडील डॉ. द.गो.काणे यांच्याबरोबर वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. गावात एक्स-रे ची सोय नसल्याने लोकांना तपासणीसाठी ६० कि.मी. वरील धुळे येथे जावे लागत असे. ही अडचण लक्षात घेऊन सर्वांच्या सोयीसाठी डॉ. काणे यांनी गावात एक्स-रे ची सोय केली.
वैद्यकीय सेवेबरोबरच शैक्षणिक व सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असे. नंदूरबार एज्युकेशन सोसायटीच्या संस्थांसाठी कार्याध्यक्ष, तसेच अध्यक्ष ह्या दोन्ही पदांची जबाबदारी घेऊन त्यांनी सक्रीय व अविरत कार्य केले. नंदूरबार येथे सुरुवातीस विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासाठी एकत्र हायस्कूल होते. आपले वडील कै. डॉ. द. गो. तथा तात्यासाहेब काणे यांचे मुलींसाठी स्वतंत्र हायस्कूल असावे हे स्वप्न डॉ.नी जिद्दीने व नेटाने अथक परिश्रम करून साकार केले व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र हायस्कूल १९७८ पासून सुरु झाले. त्याचाबरोबर महिला विद्यापीठचे परीक्षा केंद्रही सुरु केले. त्यावेळचे त्यांचे हे शब्द सर्वांच्या चिरस्मरणात राहिले आहेत त्या शाळेला डॉ. काणे गर्ल्स स्कूल असे नाव देण्यात आले.
पुढे त्यांनी १९७५ मध्ये सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालयासह कला, शास्त्र व वाणिज्य शाखा असलेली कनिष्ठ महाविद्यालय सुरु केले. त्यांना स्वतःला खेळाची आवड असल्याने त्यांनी देशी व विदेशी खेळांची सोय उपलब्ध करून दिली. वाचनाच्या आवडीमुळे त्यांचा ऐतिहासिक, धार्मिक ग्रंथांचा, तसेच दर्जेदार मासिकांचा मोठा संग्रह होता. रेडक्रॉसची स्थापना करून त्यांनी रुग्णसेवेसंबंधी शिबिरे घेतली. शहर व ग्रामीण भागाबरोबरच आदिवासी भागातील रुग्णांची पण वैद्यकीय सेवा केली. नंदूरबारमधील समस्त ब्राह्मण समाजाचे नेतृत्व करून त्यांनी विविध उपक्रम केले.
कित्येक वर्षांपासूनचा रक्तदाबाचा त्रास, हृदायावर आलेला ताण यावर मात करीत, अखेरपर्यंत त्यांनी प्रसिद्ध पराङमुख राहून कार्य केले. श्रीदत्तगुरुंवर नितांत श्रद्धा असणारे, गुरुचरित्राची पारायणे करणारे व सातत्याने दरवर्षी गाणगापूरला जाणारे दादा काणे यांना १७ जानेवारी, २००० रोजी देवाज्ञा झाली.