कै. डॉ. मधुसूदन सिद्धनाथ काणे |
गरिबांचे मासिहा
डॉ. मधुसूदन सिद्धनाथ काणे ह्यांचा जन्म १६ जुलै १९२३ रोजी यवतमाळ येथे झाला. प्रख्यात क्रांतिकारक डॉ. सिद्धनाथ कृष्णाजी काणे हे त्यांचे वडील ! त्यांचे बालपण अतिशय संपन्नतेते व्यतीत झाले. पण त्यानंतर त्यांचे वडील व काका समाजकारणात उतरले, पण त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊन बिकट व आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागले. अशा कठीण काळांत मधुसूदन काणे यांना मॅट्रिकनंतर वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी बनारस हिंदू विश्वविध्यालयात प्रवेश घेऊन ए.एम्.एस्. ची पदवी घ्यावी लागली. पण ती एक सुवर्णसंधीच ठरली कारण तेथे त्यांना पं. मदनमोहन मालवीय, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारख्या व्यक्तींना जवळून पाहण्याचा – ऐकण्याचा योग आला.
पदवी घेऊन परतल्यावर वडिलांच्या सांगण्यावरून यवतमाळ येथेच वैद्यकीय व्यवसाय सूरु केला. वडिलांच्या परोपकाराचा व समाजसेवेचा आदर्श सतत डोळ्यापुढे असल्यमुळे, मनाशी खूणगाठ बांधली की, हा व्यवसाय मे एक लोकसेवा म्हणून करेन. २२ जानेवारी, १९४८ रोजी नागपूरचे प्रख्यात राजकारणी डॉ. ना. भा. खरे यांची कन्या कुसुम हिच्याशी त्यांचा विवाह होऊन त्या सौ. श्यामला मधुसूदन काणे झाल्या. वडील डॉ. सिद्धनाथ कृष्णाजी काणे व सासरे डॉ. ना. भा. खरे याच्याप्रमाणेच स्वतःचे स्थान निर्माण करण्याची आकांक्षा मधुसूदनांच्या मनामध्ये असावी.
लवकरच यवतमाळमध्ये ‘हातगुण’ असलेला डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होऊ लागली. याचबरोबर सर्वांना एका गोष्टीचे आश्चर्यमिश्रित कौतुक वाटे, की डॉ. स्वतः कधीही फी मागत नाही आणि गरिबांकडून तर नाहीच नाही ! लोकांना वाटेल ते चार आण्यांपासून सुद्धा लोक देत. पण ते पैसे फी म्हणून नाही तर ज्या भक्तिभावाने भक्त देवासमोर पैसे ठेवतो तीच भावना त्यात होती. थोड्याच अवधीत डॉ. काणे गावातील सर्व लोकांचे फॅमिली डॉक्टर झाले. लोक त्यांच्या कौटुंबिक अडचणीसुद्धा डॉक्टरांशी विश्वासाने सांगत व त्यांचा सल्ला घेत. यवतमाळमधील तळागाळातील, तसेच मुस्लिम समाजातही ते खूप लोकप्रिय झाले. अहर्निश सेवा करणारा, उत्तम वैद्यक सल्ला देणारा व फी न मागणारा असा ‘गरीबांचा मसीहा’ अशीच त्यांची प्रतिमा तयार झाली. न मागताही लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न झाली, पण एवढे असूनही सुखासिन आयुष्य ते कधीच जगले नाहीत, भौतिक सुखापासून दूर एखाद्या निर्मोही तपस्व्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत केले.
वैद्यकीय व्यवसाय व्रताप्रमाणे करत असतानाच ते यवतमाळच्या सामाजिक कार्यातही सक्रीय होते. ५५ वर्षे वैद्यक सेवा आणि अनेक संस्थांमधील सक्रीय सहभाग, ज्यामध्ये हनुमान आखाड्याचे आजीवन कंट्रोलर पद आणि मुस्लिम धुमाल शाहवले बाबा दर्ग्याच्या उर्स कमिटीचे आजीवन अध्यक्ष ही पदे, ते सगळ्या थरातील, जातीतील व धर्मातील लोकात किती लोकप्रिय होते हे दर्शवितात. सगळ्या राजकीय पक्षांना ते नेहमीच जवळचे वाटत. आखिल भारतीय ब्राह्मण सभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांच्या कालावधीतच गरीब ब्राह्मण मुलांचे सामुदायिक व्रतबंध, विवाह घडवून आणले गेले. दरम्यान जनसंघाचे यवतमाळचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आले. मात्र निवडणुकीपासून ते कायम दूरच राहिले.
४० वर्षांपूर्वी यवतमाळसारख्या छोट्या गावात मारवाडी, मुस्लिम समाज व इतर बहुजन समाजातील मुलींना मुलांबरोबर पाठवण्याची पालकांची तयारी नसे. मुलींसाठी स्वतंत्र कॉलेज नसल्यामुळे मुली मट्रिकनंतर शिकतच नसत. डॉ. काणे यांनी ही गोष्ट बरोबर जाणली होती. स्वत:चे तन-मन-धन खर्चून व अथक प्रयत्न करून Education Society संस्थेच्या लो. ना. बापूजी महिला विद्यालयाची १९७३ साली स्थापना केली. याशिवाय यवतमाळमधील पुढील संस्थांच्या उभारणीत डॉ. काणे यांचा मोठा सहभाग होता व अखेरपर्यंत निकटचा संबंध होता. आबासाहेब पारवेकर विद्यामंदिर, डॉ. बाबसाहेब नांदुरकर शारीरिक शिक्षण विद्यालय, महाविद्यालय, लायन्स क्लब, लायन्स क्लब इंग्रजी माध्यम शाळा, विशुद्ध शिक्षण संस्था, चित्पावन ब्राह्मण सभा, यवतमाळ आयुर्वेदिक कॉलेज, यवतमाळ, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, यवतमाळ, रिमांड होम, यवतमाळ.
डॉ. काणे यांना ४ भाऊ ५ बहिणी होत्या. चारही भाऊ विद्यासंपन्न होते. डॉ. काणे यांच्या सर्व मुली उच्च विद्याविभूषित आहेत. २००८ साली वाई येथे झालेल्या काणे संमेलनात डॉ. काणे यांच्या मुली उपस्थित होत्या आणि त्यांनी काणे प्रतिष्ठानचे आजीव सदस्यत्व घेतले. ५५ वर्षांच्या आथक वैद्यक सेवेनंतर २००२ साली वृद्धावस्थेमुळे यवतमाळचा कायमचा निरोप घेऊन पत्नी व एका मुलीसह डॉ. काणे पुण्यात स्थाईक झाले. डॉ. मधुसूदन काणे या सेवाव्रतीचे वयाच्या ८५ व्या वर्षी ५ ऑगस्ट, २००९ रोजी पुण्यात दु:खद निधन झाले.