कै. अॅडव्होकेट वासुदेव सीताराम काणे

एक सच्चा मानवतावादी

मानवतावादी कुटुंबातील सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे, गाजावाजा न करता त्यांच्यातील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करणारे व मानवतावादी विचार रुजविण्यासाठी नवनवीन योजना आखून त्या स्वखर्चाने अंमलात आणणारे कै. व. सि. काणे यांचा जन्म कोकणातील खेड  तालुक्यातील मुरुडे  ह्या छोट्या गावी १७ जुलै १९१४ रोजी झाला. त्यांच्या आईला, पती निधनानंतर, आपली तीन मुलगे व एक मुलगी घेऊन आपल्या माहेरी पालगड येथे बिऱ्हाड हलवावे लागले. काणे यांनी पालगड येथे, सतत पहिल्या क्रमांकाने शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे हायकोर्ट प्लीडर ही परीक्षा देऊन वकिलीची सनद मिळवितानाही पहिला वर्ग कायम ठेवला व पुणे येथे १९३७ सालापासून वकिलीच्या व्यवसायास प्रारंभ केला.
त्याच सुमारास १९४० मध्ये ‘ट्रेड मार्क’ चा कायदा पास झाला. ह्या नवीन कायद्याचा कसून अभ्यास करून अॅडव्होकेट काणे (बापूसाहेबांनी) ह्या नवीन विषयाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी ह्यासाठी मराठीतून ‘व्यापार चिन्ह आणि कायदा’ ह्या विषयावर पुस्तक लिहिले. त्यांच्या बंधूंचे स्नेही श्री. डी. व्ही. जोशी ह्यांच्या सल्ल्यानुसार बापूसाहेबांनी मुंबईत वकिलीचा व्यवसाय सुरु केला व लवकरच गिरगाव येथील Survants of India Society’s इमारतीमध्ये स्वतंत्र ऑफिसही सुरु केले. १९४२ मध्ये अत्यंत दूरदृष्टी ठेऊन त्यांनी intellectual Properity Law (Trade mark, Patents,Design and Copyright) ही कायद्याच्या क्षेत्रातील वेगळी वाट निवडली व आपल्या वकिली व्यवसायाला W.S. Kane and Co. ह्या नावाने प्रारंभ करून यशस्वीरित्या आपला व्यवसाय वाढविला.
पुण्याच्या  कृष्णा पुरुषोत्तम आगाशे यांच्याशी ३० डिसेंबर, १९४२ रोजी त्यांचा विवाह संपन्न झाला. विवाहानंतरची पहिली दोन वर्षे मुंबईला दिवसा ऑफिस करायचे आणि रात्री ‘संग्राम’ दैनिकात श्री. डी. बी. कर्णिक , श्री. नाडकर्णी इत्यादी मानवतावादी सहकाऱ्यांसह काम करून तेथेच झोपायचे, शनिवारी डेक्कन क्वीनने पुणे गाठायचे व सोमवारी सकाळी परत मुंबईत हजर व्हायचे असा दिनक्रम चालला होता. अखेर दोन वर्षांनंतर दादरला प्लाझा सिनेमासमोर एका खोलीत बिऱ्हाड मांडून संसार सुरु झाला.
श्री. काणे यांनी इंडियन सेक़्युलर फोरम, सोशल सर्व्हीस लीग, सोशल रिफॉर्म असोसिएशन इ. अनेक संस्थांच्या माध्यमांतून समाजकार्य केले. डॉ. इंदुमती पारीख, डॉ. द. डी. पारीख, डी. बी. कर्णिक, अॅड. राणे, अॅड. जहागीरदार, डॉ. पोतदार, अॅड. दळवी अशा थोर व्यक्तींनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल चेंज’ या समाज प्रबोधन करणाऱ्या संस्थेत श्री. काणे यांनी कार्यवाह म्हणून अनेक वर्षे कार्य केले. डॉ. इंदुमती पारीख, डॉ. द. डी. पारीख यांच्या समवेत ‘नवजागृती ट्रस्ट’ स्थापन करून समाजात प्रबोधन व जागृती करणाऱ्या अनेक पुस्तकांचे प्रकाशन केले. प्रसिद्ध क्रांतीकारक व तत्वज्ञानी श्री. मानवेंद्र रॉय ह्यांच्या विचारांचा प्रभाव श्री. काणे यांच्या मनावर असल्याने ते त्यांचे अनुयायी (रॉयीस्ट) झाले व त्यांनी गरजूंना मदत कार्यास सुरुवात केली.
चंगळवादी कृती त्यांना मान्य नव्हती आणि भौतिक सुखाचे तर मुळीच आकर्षण नव्हते. आपल्या आजोळच्या गावी शाळा बांधण्यात त्यांनी पुढाकार घेऊन आर्थिक सहाय्य केले, तेथे ग्रंथालयाची कल्पना स्वखर्चाने राबविली आणि तेही स्वतःचे नाव कोठेही न येऊ देता ! पालगडच्या सानेगुरुजींच्या नावाने प्रसिध्द असलेल्या शिक्षण संस्थेचे ते एक व्यवस्थापक होते. आयुष्यात त्यांनी कधीही सत्कार स्विकारले नाहीत. स्वतःचा ७५ वा वाढदिवसही कांबर्ली गावातील लोकांना घोंगड्या वाटून साजरा केला. त्यांचे वास्तव्य असलेल्या लोकमान्य को. ऑप. सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
उगवत्या तरुण पिढीचे मनोगत जाणून घेऊन त्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी त्यांनी ‘एका परिवर्तनवादी तरुणाचे आत्मशोधन’ हे, सामाजिक विषयाची बांधिलकी असलेल्या विषयावर, पुस्तक लिहिले होते. समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मिळकतीतून “ W. S. Kane Humanist Trust” ची स्थापना केली. दरवर्षी ह्या ट्रस्टतर्फे पारधी समाज, आदिवासी क्षेत्र, वेश्या मुलांचे संगोपन, कर्णबधीर मुलांच्या खेडयातील शाळा,अनाथगृहे अशा जनहितासाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करण्यात येते. समाजकार्याव्यतिरिक्त फोटोग्राफी, वाचन व लेखन हे त्यांचे छंद होते.
त्यांच्या पत्नी सौ. मंगला वासुदेव काणे ह्यांनी विवाहानंतर फिलॉसॉफीसारख्या अवघड विषयात एम.ए.ची पदवी प्राप्त केली आहे. वनिता समाज, स्त्री हितकारिणी,नंदादीप समिती इ. संस्थांमध्ये त्या कार्यरत होत्या. वनिता समाज, लोकमान्य भगिनी मंडळांची अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. फान्स मित्र मंडळ, पुणे ह्यांच्या मुंबई शाखेच्या त्या संस्थापिका आहेत. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे वयाच्या ७० व्या वर्षी अत्यंत कठीण अशी “कैलास मानस सरोवर” परिक्रमा त्यांनी पूर्ण केली आहे. सौ. तेजस्विनी किशोर भावे  ह्या त्यांच्या कन्या बी.एस्सी.,एल्.एल्.बी. असून काही काळ त्या वडिलांच्या बरोबर वकिली करत होत्या.
समईच्या ज्योतीच्या प्रकाशासारखे अत्यंत शांत,सोज्वळ प्रकाश देणारे व काणे कुळाला अभिमान वाटावा असे मागील पिढीतील एक कर्तुत्ववान व्यक्तिमत्व दि. २४ मार्च, १९९८ रोजी अनंतात विलीन झाले.
 

CONTACT DETAILS

Kane Pratishthan
Mr. Suhas Anant Kane, Flat No.A 26, B1 Building, Aranyeshwar park, Sahakar Nagar No.1, Pune 411 009.
Copy Rights ©Kane Parivar